ठाणे : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लावलेल्या लॉकडाऊनमुळे ठाणे शहरातील हवेच्या गुणवत्तेमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा अनलॉक झाल्याने वाढलेल्या रस्त्यावर वाहनांच्या संख्येने आणि इतर कारणांमुळे हवेची गुणवत्ता ढासळल्याचे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण अहवालातील नोंदीवरून समोर आले आहे.
शहरातील २० पैकी तब्बल १४ चौक प्रदूषित व ५ चौक अतिप्रदूषित असल्याचे दिसत असून कॅडबरी नाका चौकात मात्र माध्यम प्रदूषणाची नोंद झाली आहे.रेतीबंदर, कॅसलमिल नाका,मुंब्रा फायर स्टेशन परिसर तसेच बाळकूम नाका हे चौक अतिप्रदूषित आहेत.यात सर्वाधिक प्रदूषण हे शिळफाटा येथे नोंदवले गेल्याचे अहवालात नमूद आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रदूषण अहवालामध्ये शहरातील प्रमुख २० चौकात हवेची गुणवत्ता तपासण्यात आली.यामध्ये १४ चौक प्रदूषित तर ५ चौकातील हवा अतिप्रदूषित असल्याचे दिसुन आले. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ० ते ५० एअर क्वालिटी इंडेक्सची नोंद झाल्यास हवेची गुणवत्ता चांगली असल्याचा निष्कर्ष काढला जातो.५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम,२०१-३०० प्रदूषित, ३०१ ते ४०० अत्यंत प्रदूषित आणि ४०१-५०० गंभीर स्वरुपाचे प्रदूषण मानले जाते.ठाण्यातील कॅडबरी सिग्नल चौक वगळता सर्वच चौक प्रदूषित असल्याचे या अहवालामधून समोर आले आहे.
शहरातील हवेची गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स)
नितीन कंपनी नाका- १५९, मुलुंड चेक नाका -१३३, किसननगर नाका १७०, शास्त्रीनगर नाका १९९, उपवन बस डेपो - १२७, वाघबीळ नाका - १९७, बाळकूम नाका -२०१, कॅसल मिल नाका -२२०, गावंदेवी नाका १४०, विटावा नाका- १४०, शिवाजी चौक (कळवा) - १४७, कोर्ट नाका- १२०, एलबीएस नाका - १४३, कापूरबावडी नाका - १७३, कोपरी प्रभाग समिती - १६०, मुंब्रा फायर स्टेशन - २१८, रेतीबंदर - २२७, शिळफाटा -२३०, कल्याण फाटा - १४१ कॅडबरी नाका -९८.अशी हवेची गुणवत्ता नोंद झाली आहे.
प्रदुषण कमी करण्यासाठी उपाययोजना
प्रदुषणाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच हवेतील धुलीकण पसरू न देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने शहरातील तीनहात नाका आणि माजिवडा नाका येथे मिस्ट स्प्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच शहराच्या विविध भागात फिरून धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डस्ट मशिन घेण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे.या मशिनच्या माध्यमातून प्रदुषण कमी करण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.