हिंदूत्वाशी गद्दारी करून ठाकरेंनी मिळवलं मुख्यमंत्रीपद
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यभर पडसाद उमटत आहेत. यावरून राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेकही केली. राणेंना पोलीसांनी अटकही केली आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या जन आशीर्वाद यात्रेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान संगमेश्वर येथे आयोजित सभेत राणेंनी शिवसेनेवर पुन्हा टीका केली.
यावेळी ते म्हणाले, "राज्यात यांची सत्ता आहे. ५६ आमदार आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करुन त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. पण इथे १२ झेंडे दिसत आहेत. काय अवस्था झाली आहे यांची. मी जर आत्ता सांगितलं तर त्यांची पळता भुई थोडी होईल. हे काही दिवसांनी सत्तेवर नसतील. घऱी जावा नाहीतर आम्हाला घऱी पाठवावं लागेल."
शिवसैनिकांची घोषणाबाजी
सभेदरम्यान काही शिवसैनिक घोषणा देत होते. त्यांना गप्प करण्यासाठी राणे यांनी टोला लगावला. "हे आत्ता शेवटची धडपड करत आहेत. काही दिवसांनी हे सत्तेवर नसतील आणि ह्या समोरच्यांच्या हातात पण काही दिवसांनी हा झेंडा नसेल. त्यांचं मनपरिवर्तन होईल.", असाही टोला त्यांनी लगावला.