आधार देणारा समाजसेवक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2021   
Total Views |

Nitin _1  H x W


कोरोना महामारीचा फटका मोठ्या शहरांपासून ते अगदी गावखेड्यांपर्यंत बसला. एकीकडे आरोग्याची काळजी तर दुसरीकडे पोटापाण्याचा प्रश्न... पण, या संकटसमयी कित्येक कोविड योद्ध्यांनी अगदी देवदूतासारखेच लाखोंना मदतीचा हात दिला. आपल्या कार्याच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करीत अनेकांना आधार देणारे आणि प्रसंगी एकट्याने आंदोलन करून शासकीय यंत्रणेस जाग आणणारे नितीन गायकर यांच्या कार्याविषयी...
 
 
वैश्विक स्तरावर सगळ्यांच्याच चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनाबाबत अनेक प्रकारे मंथन झाले. सन २०२० पासून सुरू असलेली कोरोनाबाबतची चर्चा, त्यावरील उपचार, नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या, निर्माण होणारे सामाजिक प्रश्न यामुळे अनेकांना अनेकदा आधाराची निकड वाटत आहे. अशा वेळी कोरोना हा केवळ आजार नाही, तर ती परस्परांना आधार देणारी सेवेची संधी आहे, अशी पेरणी समाजात आपल्या कार्याच्या माध्यमातून जर कोणी केली, तर ती समाजासाठी नक्कीच आशादायी आणि फलदायी ठरत असते. नाशिक जवळील गिरणारे येथील नितीन गायकर नेमका हाच विचार आपल्या कृतीतून समाजात रुजवित आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत त्यांनी केलेले कार्य हे अनेकांसाठी आधारभूत असेच ठरले.
 
 
मागील वर्षी २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित राहिला होता. अशा वेळी गायकर यांनी गरजू व्यक्तींना डाळ, तांदूळ, चहा पावडर, साखर असे आवश्यक जिन्नस आदी साहित्याचे वाटप करत त्यांना आधार दिला. त्याचप्रमाणे पोळी, भाजी, खिचडी अशा अन्नपदार्थांचे वाटप करत अनेकांची क्षुधातृप्तीही त्यांनी केली. त्याचप्रमाणे सामाजिक आरोग्य अबाधित राहावे, यासाठी त्यांनी मास्क, सॅनिटायझर, औषध फवारणी आदी कार्य केले. सुरक्षा व आरोग्य कर्मचारी यांना जेवण व इतर आरोग्यविषयक साधने उपलब्ध होण्याकामी गायकर यांनी कार्य करत मोलाची भूमिका बजावली.
 
 
सामाजिक जनजागृतीसाठी त्यांनी समाजमाध्यमांचा खुबीने वापर केला. याच काळात त्यांच्या पुढाकारातून गिरणारे परिसरात ‘गोदा काश्यपी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ उभी राहिली. यात शेतकरीवर्गासाठी शेतमाल खरेदी, तसेच ग्राहकांसाठी विक्री केंद्र उभारले. त्यामुळे मुंबई, नाशिक येथे घरोघरी अत्यंत माफक व रास्त दरात शेतकरी वर्गाला आपला शेतमाल विकणे सहज शक्य झाले. पहिली लाट ओसरल्यावर आणि जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्यावरदेखील त्यांचे सामाजिक कार्य चालूच होते. कोरोना हा पसरणारा आणि केव्हाही डोके वर काढणारा आजार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सजगता बाळगणे आवश्यक आहे. हे गायकर यांनी जाणले होते. त्यामुळे पहिली लाट ते दुसरी लाट या मधल्या काळात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यावर गायकर यांनी भर दिला.
 
 
 
यंदाच्या वर्षी जेव्हा फेब्रुवारी-मार्चमध्ये नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली, तेव्हा मार्च महिन्यात गायकर स्वतःही कोरोनाबाधित झाले होते. दरम्यानच्या काळात शहर व जिल्ह्यात कोरोनाची भीषणताही वाढत होती. अशा वेळी गिरणारे हे आपले गाव पूर्णत: बंद करण्याचा विचार गायकर यांनी मांडला. त्याला गावकर्‍यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. पंचक्रोशीतील इतर गावांच्या तुलनेत गिरणारे हे बाजारपेठेचे गाव असल्याने तेथे लागण होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे गायकर यांचे ‘गावबंद’चे पाऊल हे महत्त्वाची भूमिका बजाविणारे ठरले. गिरणारे येथे रुग्णसंख्या वाढत होती. अशा वेळी शासकीय ‘व्हेंटिलेटर’ सुविधा असणारे ‘कोविड केअर सेंटर’ गिरणारे येथे सुरू व्हावे, यासाठी गायकर यांनी आग्रह धरला. गिरणारे येथे गायकर, गावकरी व विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून ३० खाटांचे ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात आले.
 


Nitin _2  H x W

 
कोरोनाची दुसरी लाट आली, तेव्हा नाशिकमध्ये एक वेळ अशी आली होती की, ‘ऑक्सिजन’ची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत होती. एका रात्री या सेंटरमध्ये २२ रुग्ण हे ‘ऑक्सिजन’वर होते. त्यात नऊ ते दहा रुग्ण गंभीर स्थितीत होते. अशा वेळी रात्री १ वाजता केवळ दोन तास पुरेल इतकाच ‘ऑक्सिजन’ शिल्लक होता. त्यावेळी गायकर यांनी अथक प्रयत्न करत केवळ दोन तासांत १२ ‘ऑक्सिजन सिलिंडर’ उपलब्ध करून देत रुग्णांना एकप्रकारे जीवदान दिले. अनेक रुग्णांना स्वखर्चाने औषधे पुरविली. नाशिकमध्ये ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा तुटवडा असताना १००च्या आसपास रुग्णांना स्वखर्चाने गायकर यांनी हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले. ३,५०० कुटुंबांना मोफत भाजीपाला घरपोच दिला. १७ कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करत असताना सहा निराधार लोकांना त्यांनी दत्तक घेतले आहे.
 
 
 
सुरुवातीला ‘एकला चलो रे’च्या भूमिकेतून कार्य करणार्‍या गायकर यांना पुढील काळात व्यापारी वर्ग, दानशूर व्यक्ती, तुषार शेजपाल, प्रदीप सोनवणे, बाजीराव थेटे, बाळकृष्ण हांडोरे, गिरणारे गावच्या सरपंच अलका दिवे, गिरणारे येथील व्यापारी ग्रुप, मर्सल फुड्स प्रा. लि., या संस्था व व्यक्ती यांनी वस्तू व रोख रूपाने मदत केली. शासकीय उदासीनता, नागरिकांचे स्वतःच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या समस्यांचा सामना गायकर यांना या काळात करावा लागला. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रांशी संवाद, प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसले. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्याकामी मदतीचा ओघ अविरत सुरू ठेवला. ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन गायकर यांनी उपलब्ध करून दिल्याने अनेकांनी त्यांच्या कार्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
 
 
ज्यांच्या घरात चूल पेटणार नाही, अशा लोकांना सकाळ व संध्याकाळ २६० प्लेटचे संपूर्ण ‘कोविड’काळात भोजन दिले. गायकर यांच्या वडिलांचे छत्र त्यांच्या बालपणीच हरवले. त्यातून त्यांची ‘कुटुंब’ ही संकल्पना अधिक व्यापक झाली आहे. कुटुंबाची असणारी जबाबदारी, यामुळे अडचणींची असणारी जाण, या गोष्टी गायकर यांच्या या कार्यामागील प्रेरणा ठरल्या. गायकर यांच्या मातोश्री मंजुळा गायकर या गिरणारे ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यामुळे त्या समाजाच्या वेदना अगदी जाणून होत्या. तसेच घरातील इतर सदस्य यांनी गायकर यांना याकामी पाठिंबा दिला.
 
 
पहिली लाट ते दुसरी लाट आणि या दोहोंमधील काळ या सर्व प्रक्रियेत गायकर यांनी आपले सामाजिक भान जागृत ठेवतानाच जनजागृतीवर भर दिला. एकट्याने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. गावकर्‍यांना गावातच उपचार मिळावे, यासाठी पुढाकार घेतला. त्यांचे काम बघून नाशिक जिल्ह्यातून इतर भागांतून मदत मागण्यात आली आणि त्यांनी ती पूर्णही केली. परिणामस्वरूप लोकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. त्यामुळे कोरोना या आजाराशी मुकाबला करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची एक शृंखला तयार होण्यास मदत झाली. गायकर यांनी केलेले कार्य हे अनमोल असून त्यांना मिळालेली साथदेखील बहुमोल अशीच आहे.



@@AUTHORINFO_V1@@