नवी दिल्ली : “सुरक्षा दलांची खबर देण्यासाठी नक्षलवादी गट लहान मुलांचा वापर करीत आहेत. त्यासाठी लहान मुलांना सैन्याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येत आहे,” अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत मंगळवार, दि. २७ जुलै रोजी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. त्यामुळे नक्षलवादी आता लहान मुलांना लक्ष्य करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नक्षलवाद्यांकडून विविध कारवायांसाठी लहान मुलांचा वापर करण्यात येत आहे का, नक्षलवादी गट लहान मुलांची भर्ती करीत आहे का आणि अशा मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारतर्फे काय उपाययोजना करण्यात येत आहेत, असा तारांकित प्रश्न गृहमंत्रालयास लोकसभेत विचारण्यात आला होता. त्यास केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले.
केंद्रीय मंत्री राय म्हणाले, “झारखंड आणि छत्तीसगढ येथे माओवादी संघटनेत लहान मुलांची भर्ती करण्यात येत आहे. भर्ती केल्यानंतर मुलांना सैन्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जात असल्याचे समोर आले आहे. या लहान मुलांचा वापर स्वयंपाक करणे, दररोज वापराच्या वस्तूंची ने-आण करणे आणि सुरक्षा दलांच्या हालचालींची खबर देण्यासाठी केला जात असल्याचे काही अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. मात्र, हा विषय राज्यांच्या अखत्यारित येत असल्याने त्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार हे राज्यांना आहेत.”
“केंद्र सरकारच्या ‘किशोर न्याय (बालकांची देखरेख आणि संरक्षण) अधिनियम, २०१५’ अंतर्गत तणावात असलेल्या आणि देखभालीची गरज असलेल्या बालकांसाठी तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याच्या आधारे गैरराज्यीय, स्वयंभू उग्रवादी समूह अथवा गटाने कोणत्याही कामासाठी लहान मुलांची भर्ती केली अथवा वापर केल्यास त्याविरोधात फौजदारी खटला चालविता येतो,” असेही नित्यानंद राय यांनी आपल्या उत्तरात सांगितले. त्याचप्रमाणे महिला व बालविकास मंत्रालयातर्फे तणावपूर्ण स्थितीत राहणार्या बालकांसाठी बाल संरक्षण सेवा योजना कार्यान्विय केली जात आहे. त्याचप्रमाणे नक्षलवाद्यांनी शस्त्रांचा त्याग करून मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, यासाठी आत्मसमर्पण - सह-पुनर्वसन धोरण राज्यांतर्फे राबविण्यात येत असून त्यामध्ये केंद्र सरकारदेखील साहाय्य करीत असल्याचे राय यांनी नमूद केले.
नक्षलवाद्यांद्वारे अपहरण, लूट तसेच पायाभूत सुविधांवर हल्ले
नक्षलवाद्यांद्वारे अपहरण, लूट तसेच पायाभूत सुविधांवर होणार्या हल्ल्यांची आकडेवारीदेखील अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. त्यामध्ये गेल्या तीन वर्षांत मोबाईल टॉवर, खाण उद्योग, रेल्वे, सरकारी इमारती, शाळा, रस्ते आणि पूल यांच्यावर हल्ल्याच्या घटना घडल्या सुरक्षा दलांची खबर देण्यासाठी नक्षल्यांकडून लहान मुलांचा वापर विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची लोकसभेत माहिती.