नवी दिल्ली : “देशातील नागरिकांनी नियमांचे पालन करून सावधगिरी बाळगली आणि लोकसंख्येच्या मोठ्या समूहाचे लसीकरण यशस्वी झाल्यास देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार नाही,” अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात ‘एम्स’चे निदेशक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी गुरुवार, दि. १ जुलै रोजी दिली.
देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर एम्सचे निदेशक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्वाचे प्रतिपादन केले आहे. ते म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही हे आपल्या सर्वांच्या वागणुकीवर अवलंबून आहे.
जर देशातील नागरिकांनी सावधगिरी बाळगली, सर्व नियमांचे पालन केले आणि लोकसंख्येच्या मोठ्या समुहाचे लसीकरण ठरविलेल्या वेळात पूर्ण करण्यात यश आले तर तिसरी लाट येणार नाही आणि आली तरी त्याचा मोठा स्फोट होणार नाही. मात्र, यासाठी देशातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. देशातील ज्या भागांमध्ये अद्यापही संसर्गाचे प्रमाण अधिक आहे, तेथे आक्रमकपणे उपाययोजना राबविण्याची गरज त्यांनी सांगितली.
ते पुढे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण आता झपाट्याने कमी होत आहेत, मात्र काही ठिकाणी पॉझिटीव्हीटी दर अद्यापही वाढताच आहे. त्यामुळे तेथे काळजी घेऊन ते भाग संसर्गाचे हॉटस्पॉट बनणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. लसमिश्रणाविषयी अद्याप अधिक माहिती प्राप्त होण्याची गरज असल्याचेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.