> बीएच्या इतिहास अभ्यासक्रमात वेद, उपनिषद, सरस्वती संस्कृतीचा समावेश
> मुघलांचा उल्लेख ‘आक्रमक’ म्हणून; अभ्यासक्रमातून ‘अजेंडा’ वगळल्याने डाव्यांना पोटशूळ
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात ‘युजीसी’ने कला शाखा पदवीसाठीचा (बीए) इतिहास या विषयाचा नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. विशेष म्हणजे, यावेळी ‘युजीसी’ने अभ्यासक्रमास भारतीय चेहरा प्रदान केला असून भारताचा प्राचीन सुवर्णकाळ, वेद, उपनिषद, सरस्वती संस्कृती आदी विषयांचा समावेश केला आहे. त्याचवेळी मुघलांना ‘आक्रमक’ संबोधले असून त्यामुळे विशिष्ट ‘अजेंडा’ चालविणाऱ्या डाव्या विचारांच्या मंडळींना पोटशूळ उठला आहे.
भारतातील विद्यापीठांची नियामक संस्था असलेली ‘युजीसी’ विद्यापीठांचा अभ्यासक्रम ठरवित असते. गेली अनेक दशके देशातील सत्ताधाऱ्यांना विशिष्ट ‘अजेंडा’ रेटायचा असल्याने ‘युजीसी’मध्येही विशिष्ट विचारधारेच्या लोकांची नियुक्ती येत होती. त्यामुळे प्रामुख्याने इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम ठरविताना भारतीय संस्कृती, प्राचीन भारतीय इतिहास, वेद, सरस्वती संस्कृती आदी विषयांना टाळून मुघलांचे उदात्तीकरण करण्यात येत होते.
मात्र, आता ‘युजीसी’ने इतिहासाच्या अभ्यासक्रमाचे भारतीयकरण करून इतिहासाला एकप्रकारे नवे वळण देण्याचे ठरविले आहे. इतिहासाच्या अभ्यासक्रमातील पेपर क्र. १ मध्ये ‘आयडिया ऑफ भारत’ असा एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय दृष्टिकोनातून इतिहासाचे आकलन करून दिले जाणार आहे. भारतीय इतिहासाशी संबंधित ज्ञान-विज्ञान, कला, संस्कृती आणि मनोविज्ञान यासह भारताच्या अस्तित्वाशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला आहे.
‘आयडिया ऑफ भारत’अंतर्गत भारत शब्दाचा अर्थ आणि महत्त्व, काळ आणि अंतराळ याविषयीच्या प्राचीन भारतीय संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भारतीय ऐतिहासिक साहित्य याअंतर्गत वेद, उपनिषदे, जैन आणि बौद्ध साहित्य, पुराणे यांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.
आजवर आर्य हे आक्रमक होते असा इतिहास शिकविण्यात येत होता. त्याचप्रमाणे आर्य-द्रविड असा अस्तित्वात नसलेला संघर्ष प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, आता नव्या अभ्यासक्रमानुसार आर्य आक्रमण सिद्धांतास नाकारण्यात आले आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांत झालेल्या नव्या संशोधनाचा संदर्भ देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती आणि सरस्वती संस्कृती यांच्यातील साम्याविषयीदेखील सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.