कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने परदेशी शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवस लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या लसीकरणाचा दोन दिवसांमध्ये ३४४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. मात्र, लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी परदेशी शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात यावी, असे सांगितले. त्यासाठी भाजप महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांच्याकडून आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनीसुद्धा समाजमाध्यमातून पाठपुरावा केला. त्यानंतर महापालिकेने २ व ३ जून रोजी परदेशी शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची कल्याण येथील ‘आर्ट गॅलरीत’मध्ये प्राधान्याने सोय करण्यात आली.
‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा ८४ दिवसांनी घ्यावयाचा आहे. या अंतरानुसार विद्यार्थ्यांना दुसरा डोस परदेशामध्ये घ्यावा लागेल. दोन डोसमधील अंतर कमी करून ३० ते ४० दिवसांचे करण्यात यावे, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ‘कोव्हॅक्सिन’ ही लस दिली जाणार असून, तिचा समावेश आंतरराष्ट्रीय लसीकरणाच्या यादीमध्ये नसल्याचा मुद्दासुद्धा विद्यार्थ्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.