मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यामागे ईडी चौकशीचे शुक्लकाष्ट लागले आहे. अनिल देशमुखांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून अनेक पुरावे समोर आले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र अनिल देशमुख अटकेच्या भीतीमुळे चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ करत आहेत. यावरूनच भाजपचे प्रदेश प्रवक्ता व प्रदेश प्रभारी-आर्थिक, व्यापार व उद्योग आघाडी विश्वास पाठक यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
ट्विट करत पाठक म्हणाले," शरद पवारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पावन करून घेण्यासाठी कधी ‘छगन भुजबळ‘ तर कधी ‘अनिल देशमुख‘ लागतात. पुढचा नंबर कोणाचा?",असा सवाल उपस्थित करत पाठक यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात (तत्कालीन) गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले.अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे.
त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, असे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून हे आरोप केले होते. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप झाले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पावन करून घेण्यासाठी कधी ‘छगन भुजबळ‘ तर कधी ‘अनिल देशमुख‘ लागतात. पुढचा नंबर कोणाचा?,असा सवाल उपस्थित करत पाठक यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.