प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना ईडीचा मोठा दणका; तब्बल एवढ्या कोटींची संपत्ती जप्त
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. फेमा,१९९९अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतही भोसले यांनी मोठी गुंतवणूक केल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आले होते. या गुंतवणुकीसाठी त्यांनी कोट्यवधी रुपये मोजल्याचे चौकशीअंती समोर आले.
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमिनीबाबत गुन्हा दाखल आहे. याबाबत ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ईडीने ११ फेब्रुवारीला भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी अविनाश भोसले याचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन त्याची चार तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर १२ फेब्रुवारीला अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर भोसले यांनी ईडीविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. तसेच १७ फेब्रुवारीला भोसले यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.
कोण आहेत अविनाश भोसले ?
नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला. अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटे घेतली. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.