मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) : रा. स्व. संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त साप्ताहिक विवेकद्वारा 'संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार' या विशेषांकाची निर्मिती करण्यात येत आहे. याच निमित्ताने सा. विवेकद्वारा दि. १० मे ते १४ मे दरम्यान 'संघमंत्र व्याख्यानमाला' या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. १० रोजी संघमंत्र व्याख्यानमालेचा प्रारंभ रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांच्या व्याख्यानाने होत असून पुढील तीन दिवसांच्या तीन सत्रांत अनुक्रमे सोलापूर येथील युवा पत्रकार सिद्धाराम पाटील, डॉ. हेडगेवार रूग्णालय संभाजीनगरचे सीईओ डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी आदि मान्यवरांचे व्याख्यान होईल. तसेच, दि. १४ मे रोजी विवेकानंद रूग्णालय, लातूरचे संस्थापक 'पद्मभूषण' डॉ. अशोकराव कुकडे यांच्या मार्गदर्शनाने व्याख्यानमालेचा समारोप होईल. डॉ. हेडगेवारांनी आपल्या बौद्धिकातून, जीवन चरित्रातून मांडलेली विचारसूत्रे व त्यानुसार उभी राहिलेली ९६ वर्षांची रा. स्व. संघाची परंपरा यावर कालसापेक्ष भाष्य करणारी ही व्याख्याने असतील. संघमंत्र व्याख्यानमाला वरील कालावधीत दररोज सायं. ७.०० वाजता साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेज व युट्यूब चॅनलवर व्हिडिओ स्वरूपात प्रसिद्ध होईल.
केवळ संघ स्वयंसेवकांसाठीच नव्हे तर 'राष्ट्र प्रथम' हा विचार मांडणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी उपयुक्त असा हा विशेषांक व ऑनलाईन व्याख्यानमाला आहे. त्यामुळे आपल्या विचार परिवारातील अधिकाधिक कार्यकर्ते, राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी या संघमंत्र व्याख्यानमालेला प्रतिसाद द्यावा व त्याकरिता लवकरात लवकर सा. विवेकचे फेसबुक पेज व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब करावे, असे आवाहन सा. विवेकतर्फे करण्यात आले आहे.