पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाले आणि त्यानंतर राज्यात हिंसेचे थैमान सुरू झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, अभाविप कार्यकर्त्यांच्या हत्या करणे, त्यांच्या कुटुंबियांवर हल्ले करणे, भाजपसमर्थक अनुसूचित जाती आणि जमातींच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करणे, महिलांवर बलात्कार करणे असे प्रकार सुरू झाले. राज्यात अशी स्थिती असतानाही ममता बॅनर्जी आपल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आणि राष्ट्रीय नेतृत्वाचे स्वप्न पाहण्यास मश्गूल आहेत. मात्र, बंगालमधील ‘ममतामयी’ हिंसाचाराची भीषण परिस्थिती दैनिक मुंबई तरुण भारत समोर आणत आहे. आजच्या चौथ्या भागात भाजप कार्यकर्ते सितानाथ मैती यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती घेणार आहोत.
नवी दिल्ली, पार्थ कपोले : विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दुपारपासूनच आमच्यावर हल्ला करण्याचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे आम्ही त्याच दिवशी आमचे गाव सोडले आणि ओदिशामध्ये आश्रय घेतला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरी जाऊन आईला शिवीगाळ केली आणि “तुझ्या मुलाला कुठे लपवून ठेवले आहे”, असे विचारण्यास सुरुवात केली. हिंसापिडीत भाजप कार्यकर्ते सितानाथ मैती दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना आपल्यावरील हल्ल्याविषयी सांगत होते.
पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाराचारामध्ये आतापर्यंत भाजपच्या १८ कार्यकर्त्यांचे बळी गेले आहेत. त्यासोबतच हल्ला, घर तोडणे, कुटुंबियांना धमक्या देणे, पलायन करावे लागणे असेही असंख्य प्रकार घडले आहेत. दैविक मुंबई तरुण भारतने पश्चिम मिदनापूर येथील भाजप कार्यकर्ते सितानाथ मैती यांच्या संपर्क केला. त्यांनी सध्या ओडिशामध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. ते म्हणाले, “२०१४ सालापासून भाजपचे काम करीत आहे, आयटी सेल प्रमुख अशी माझ्याकडे जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बुथप्रमुख म्हणून मी काम करीत होतो. निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहिर होत असताना दुपारीच आमच्याववर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर त्याचवेळी मी गाव सोडून ओडिशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कारण मी तेथेच थांबलो असतो तर तेव्हाच कदाचित माझा बळी गेला असता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तृणमूलचे कार्यकर्ते माझ्या घरावर चालून आले, घरी माझी आई, पत्नी आणि लहान मुलगा होता. त्यांना माझ्या आईला शिवीगाळ सुरू केली आणि “तुझ्या मुलाला कुठे लपवून ठेवले आहे ते सांग, आम्ही त्याला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देण्यास सुरूवात केली. त्यानंतर आमचे चहाचे आणि किराणामालाचे दुकानही त्यांनी उध्वस्त केले. त्यामुळे २ तारखेपासून मी ओडिशामध्येच आहे”.
सितानाथ मैती यांच्यावर यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही अशाच प्रकारचा हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे २०१४ साली त्यांच्या वडिलांवरही तृणमूल कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. सितानाथ मैती यांनी बोलताना तृणमूलच्या दहशतीचे उदाहरण सांगितले – त्यांच्या गावामध्ये तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे ग्राम पंचायत ते पोलिस ठाणे येथेही तृणमूलचा दबाव आहे. त्यामुळे पोलिस तक्रार नोंदवून घेत नाही आणि ग्रामपंचायतीमध्येही भाजप कार्यकर्ता अथवा समर्थकाचे काम केले जात नाही. केंद्र सरकारच्या योजनांची लाभार्थ्यांची रक्कमही रोखून धरली जाते. त्याचप्रमाणे मैती यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचाही प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.
जीव गेला तरी भाजप सोडणार नाही
भाजपचे काम करीत असताना मला अनेकदा तृणमूल काँग्रेसने अनेकदा त्यांच्यासोबत काम करण्याविषयी विचारले, त्यासाठी धमक्याही दिल्या. सध्या मी ओडिशामध्ये आहे, आताही मला तृणमूलचे काम केल्यास माझ्या आणि कुटुंबाला कोणताही धोका होणार नाही, असेही सांगितले. मात्र, जीव गेला तरीही मी भाजपचे काम करणे सोडणार नाही असे त्यांना स्पष्ट सांगितल्याचे सितानाथ मैती यांनी सांगितले.