कर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळा

    19-May-2021
Total Views | 144

karnala_1  H x


पनवेल :
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याशी रामशेठ ठाकूर यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने कर्नाळा बँकेचे चौकशी अधिकारी आणि सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधवर यांनी रामशेठ ठाकूर यांना दोषमुक्त करुन त्यांचे नाव या चौकशीतून वगळण्याचा निर्णय एका आदेशानुसार जाहीर केला.

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू आहे. ५१२ कोटी, ५४ लाख, ५३ हजार, २८६ रुपयांचा हा घोटाळा असून त्यामुळे बँकेचे व त्यायोगे बँकेच्या खातेदारांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी बँक स्थापन झाल्यापासून या बँकेवर संचालक म्हणून काम केलेल्या 38 जणांना चौकशीची नोटीस पाठवण्यात आली. त्यामध्ये रामशेठ ठाकूर यांचे नाव होते. या नोटिसीला उत्तर देताना रामशेठ ठाकूर यांनी संपूर्ण वस्तुस्थिती उपनिबंधकांसमोर लेखी पद्धतीने मांडली. या बँकेची नोंदणी दि. २ मार्च, १९९६ रोजी झाली असून कर्नाळा बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दि. २६ जून, १९९६ ला परवाना देऊन बँकेचे कामकाज दि. 5 ऑगस्ट, १९९६ला सुरु झाले.


रामशेठ ठाकूर दि. २ मार्च, १९९६पासून संचालक होते. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांनी संचालक म्हणून राहण्यास असमर्थता दर्शविल्याने त्यांचे नाव संचालक मंडळातून दि. ११ जून, १९९७ रोजी कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांनी कर्नाळा बँकेवर संचालक म्हणून केवळ नऊ महिने सहा दिवसच रामशेठ ठाकूर यांनी काम केले. रामशेठ ठाकूर यांनी आपला खुलासा सहकार उपनिबंधकांना लेखी कळविला असून १९९७ पासून ते आजपर्यंत या बँकेच्या संचालक वा अन्य कोणत्याही पदावर नसल्याने या अहवाल नमूद केलेल्या कालावधीमध्ये झालेल्या या घोटाळ्याशी रामशेठ ठाकूर यांचा दुरन्वयानेही संबंध नसल्याचे या खुलाशात त्यांनी स्पष्ट केले.

लेखापरीक्षणातील निरीक्षणांनुसार या बँकेतील भ्रष्टाचार हा २०१३ पासून करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार खात्याच्या उपनिबंधकांनी सदर आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीतून रामशेठ ठाकूर यांचे नाव पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला असून तसा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी संपतराव पवार, श्रीकांत गावंड आणि विनायक कोळी यांनी रामशेठ ठाकूर यांच्यावतीने काम पाहिले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121