वीज पुरवठा खंडित झाल्याने मुरुडकर रविवार पासून अंधारात !
मुरूड जंजिरा : वादळी पाऊस सुरू झाला की मुरूड तालुक्यातील जनतेला दीर्घ खंडीत वीज पुरवठ्याची मोठी समस्या आणि भीती भेडसावत असते.आताही तौक्ते वादळामुळे वीज मुख्य वाहिनीवर दोष निर्माण झाल्याने मुरुडकर रविवार पासून अंधारात आहेत .मागील निसर्ग वादळाच्यावेळी ओव्हरहेड हाय टेन्शन वीज वाहिनीचे म्हसळा ते मुरूड असे सुमारे ४५ किमी अंतरातील शेकडो 'पोल्स' कोसळून तालुक्यातील सर्व म्हणजे मुरूड शहरासहित ६० गावांचा वीज पुरवठा तब्बल २३ दिवस खंडीत राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान आणि प्रचंड त्रास भोगावा लागला होता.आता पुन्हा तौक्ते वादळामुळे जनतेला पुन्हा टेन्शन आले आहे.
मुरूड तालुक्यात ४५ किमी वरील म्हसळा तालुक्यातील पाबरा वीज उपकेंद्रातून 'ओव्हरहेड' वीज वाहिन्या टाकलेल्या असून याद्वारे वीज पुरवठा केला जातो. वादळी वारे, जोरदार पाऊस यामुळे 'पोल्स', वीज वाहिन्या तुटून पडून वीज पुरवठा कित्येक दिवस बंद राहतो.त्यामुळे प्रचंड नुकसान होऊन नागरिकांचे प्रचंड हाल होतात. हे सर्व टाळण्यासाठी मुरूडकडे येणाऱ्या वीज वाहिन्या जमिनीखालून टाकण्यात याव्यात अशी मुरूड तालुक्यातील जनतेची सातत्याने मागणी असून शासनाने अद्यापही ती पूर्ण केलेली नाही.
जोरदार वारे, वादळ किंवा मुसळधार पाऊस सुरू झाला की मुरुडकर जनतेच्या पोटात गोळा येतो.मुळात हा तालुका डोंगरी आहे.सर्व वीज वाहिन्या म्हसळा पासून रोवळा वाशी, मजगाव , मादाड , भाळगाव सावली उसडी , नांदला आगरदंडा खारआंबोली शिघ्रा आदी समुद्र परिसरातील खाजण जमीन, डोंगर, समुद किनाऱ्याला खेटून आल्या आहेत. वादळी पावसात या भागात वीज वाहिन्या किंवा पोल्स सहजगत्या वाकतात अथवा कोसळू शकतात.म्हणून मुरूड तालुक्यातील भौगोलिक रचना लक्षात घेऊन जमिनी खालून पाबरा ते मुरूड अशी वीजवाहिनी टाकणे गरजेचे आहे.