डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरात गेल्या वर्षभरापासून गटार बांधणे, पाईपलाईन आणि केबल टाकणे या कामांसाठी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र आज झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे रस्त्यांची लेव्हलींग, डागडुजी व्यवस्थित न झाल्याने या पावसात रस्त्यांची चाळण आणि गटारांची दुर्दशा झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईची कामे केली जातात. नालेसफाईला सुरुवात झालेली आहे. मात्र ही कामे केवळ २५ टक्केच पूर्ण झालेली आहेत. मोठ्या नाल्यातील काढलेला गाळ तसाच पडून राहिल्याने त्यातील अर्धा गाळ पुन्हा पावसाने गटारात गेला आहे. उस्मा पेट्रोल पंप समोरील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण पीडब्ल्यूडीकडून अद्याप पुरे झाले नाही. याठिकाणच्या रहिवाशांचे बंगले रस्त्यांच्या उंचीपेक्षा खाली गेले आहेत. त्यात गटारांची कामे अर्धवट राहिल्याने जर मोठा पाऊस आला तर आपल्या घरात पाणी येईल या भीतीने स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. एमआयडीसीमध्ये नवीन रस्ते तयार होणार असे अनेकदा फलक लागले होते. आता ते रस्ते चकाचक कधी होणार ? याची वाट स्थानिक रहिवासी पाहत आहेत.
एमआयडीसीमधील सर्व्हिस रोड, मिलापनगर, सुदर्शन नगर, मॉडेल कॉलेज परिसर येथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यात काही स्ट्रीट लाईट बंद पडल्या आहेत. आता त्या रस्त्यांवर पावसाळ्यात दोन तीन वेळा खडी रेती टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येईल. त्यामुळे रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळेल. एमआयडीसीमधील विविध कामांमुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्याचा फटका रहिवाशांना आता बसत आहे. निवासी शेवटचा बसस्टॉप जवळील आकार सोसायटीमध्ये असाच केबल फॉल्ट झाल्याने तेथील चाळीस कुटुंबांना रविवारी बारा तास विजेविना काढावे लागले आहेत. शिवाय केबल दुरुस्तीचा खर्च करावा लागला. अशा तऱ्हेने अनेक सोसायटया, बंगले यांचे केबल फॉल्ट होत आहेत आणि त्यांचा भुर्दंड रहिवाशांना करावा लागत आहे. महावितरणाच्या सर्वच ट्रान्सफॉर्मरची दुर्दशा झाली आहे. वाऱ्यामुळे झाडांचा फांदया उच्च विद्युत भाराच्या तारांवर पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळेच सोमवारी दिवसभर वीजपुरवठा ये-जा करीत होता.
वादळी पावसामुळे झाडे व फांदया कोसळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मॉडेल कॉलेज जवळील सारेगम सोसायटी समोर बदामाचे मोठे झाड पाडून तेथील वाहतुकीचा रस्ता बंद झाला आहे. मिलापनगर मधील रिध्दी सिध्दी बंगल्यासमोर अशीच झाडाची मोठी फांदी पडल्याने तेथील रहिवाशांना बाहेर पडता येत नव्हते. मिलापनगर अनुग्रह बंगल्यासमोर झाड पडले. संतोष पॅलेस हॉटेल समोरील गुलमोहरची दोन झाडे पडली आहेत. डोंबिवली एमआयडीसीमध्ये आज एकूण अंदाजे नऊ झाडे उन्मळून पडली असून एका कारचे थोडे नुकसान झाले आहे. स्थानिक राहिवश्यांची केवळ याठिकाणचे रस्ते, गटारे आणि विनाखंडीत सुरळीत वीजपुरवठा ठेवा एवढयाच मागण्या येथील लोकप्रतिनिधींकडून आहेत.