मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून तौत्के चक्रीवादळ हे कोकण किनारपट्टीवर घोंघावत आहे. मागील दोन दिवसांमध्ये केरळ आणि गोवा या दोन राज्यात त्याने विध्वंस केला आहे. हे चक्रीवादळ आता मुंबई पासून १५३ किलोमीटर वर असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई, गुजरातला सतर्कतेचा इशार दिला आहे. हवामान विभागाने 'आॅरेन्ज अलर्ट' घोषित केला आहे.
चक्रीवादळ सध्या मुंबईपासून समुद्रामध्ये १५० किमी अंतरावर घोंघावत आहे. शहरात सध्या वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किमी नोंदवण्यात आला असून मुसळधार पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेग ताशी १०० किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईत अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. तौत्के गुजरातच्या दिशेने सरकत असून आज रात्री ८ ते ९ वाजण्याचा सुमारास ते गुजरात किनारपट्टीला धडकेल. गुजरातमधील पोरबंदर ते महुआ किनारपट्टीदरम्यान हे चक्रीवादळ धडकेल. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आता या वादाळाला 'SEVERE' वादळ घोषित केले आहे .वादळाचा जोर आणि वेग पाहता उद्या संध्याकाळपर्यंत हे वादळ गुजरातची सीमा ओलांडून पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे १७ व १८ मे या रोजी गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या पाऊस जोर वाढला असून वादळाचा जोर पाहता तो अधिक वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजे मुंबई,पालघर,रायगड,ठाणे अशा विभागात वाऱ्याचा वेग ९०-१०० किमी प्रति तास इतका वाढू शकेल. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीला मोठ्या लाटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या वादळाची विध्वंसत्ता पाहता अनेक जिल्ह्याना सतर्कता घेण्यास सांगण्यात आले आहे. बांद्रा -दादर किनारपट्टी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. तसेच अनेक विमानतळावरील विमानांचे उड्डाण सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत बंद करण्यात आले आहे .