समाजभान जपणारा आनंदी डॉक्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021   
Total Views |

Dr Hardikar_1  
 
डॉक्टर म्हटलं की, रुग्णसेवा, दैनंदिन व्यस्त जीवन, कामाचा ताण या गोष्टी ओघाने आल्याच. मात्र, यातूनच वेळ काढत ज्या समाजाचे आपण देणं लागतो, त्यासाठी आपले योगदान देणार्‍या डॉ. आनंद हर्डीकर यांचा हा संघर्षात्मक प्रवास...
आनंद वामन हर्डीकर. पेशाने डॉक्टर. मात्र, वडिलोपार्जित रुजलेल्या संस्कारांमुळे आजीवन समाजकार्यातील सक्रिय सहभाग वयाच्या ७४व्या वर्षीही त्यांनी कायम ठेवला आहे. डोंबिवलीतील नागरिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत, परिचारिकांपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांचा आवाज सरकारदरबारी न्यायिक पद्धतीने पोहोचविण्याचे काम करणारे डॉक्टर, अशी त्यांचीस ख्याती. कळव्यातील राजीव गांधी मेडिकल महाविद्यालयातील प्रश्न, ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल’च्या माध्यमातून परिचारिकांसंदर्भातील प्रश्न, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या माध्यमातून राज्यातील डॉक्टरांचे प्रश्न आणि डोंबिवलीतील वृक्षारोपण मोहीम आदी कामांमध्ये पुढाकार घेऊन विविध प्रश्न मार्गी लावण्याचा सुरुवातीपासूनचा त्यांचा स्वभाव... याशिवाय एक डॉक्टर म्हणून रुग्णांसाठी सदैव ते तत्परही असतात.
 
 
 
डॉ. हर्डीकर यांचा जन्म दि. १४ एप्रिल, १९४७ रोजी राजापूरच्या कोंड्ये या गावात झाला. मॅट्रिकपर्यंत राजापूर हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. १९६५-६६ मध्ये पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात व त्यानंतर बी. जे. मेडिकल महाविद्यालयात आपले वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केले. साडेचार वर्षांच्या आपल्या शिक्षणानंतर अलिबाग येथील पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच वर्षे ‘वर्ग-२’चे वैद्यकीय अधिकारी म्हणून ते शासकीय सेवेत रुजू झाले. १९७७ मध्ये नोकरी सोडून प्रसुतिगृह उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दोन वर्षे सेवा दिल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना डोंबिवलीत स्थायिक व्हावे लागले. डोंबिवलीतील मानपाडा रोड येथे त्यांनी दवाखाना सुरू केला. मात्र, या काळातही आठवड्यातील सोमवार आणि गुरुवार असा पाच वर्षे डोंबिवली ते पोयनाड असा रुग्णसेवेसाठी प्रवास सुरू ठेवला. कालांतराने पोयनाड येथील रुग्णालय त्यांनी बंद केले आणि १९८९ मध्ये डोंबिवलीत ‘हर्डीकर हॉस्पिटल अ‍ॅण्ड पॉलिक्लिनिक’ सुरू केले.
 
 
 
डोंबिवलीत एका तापाच्या साथीने त्याकाळी थैमान घातले होते. वृत्तपत्र आणि माध्यमांमध्ये या तापाचे नामकरण ’डोंबिवली फिव्हर’ असे झाले होते. या तापाचेतीन रुग्ण डॉ. हर्डीकर यांच्या रुग्णालयात दाखल झाले होते. बघता बघता रुग्णाला ताप चढे, त्यातच या तापामुळे दगावणार्‍यांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. एका १९ वर्षीय रुग्णाला ११० ताप चढला. वांती, मळमळ असा सर्व प्रकार सुरू होता. डॉक्टरांनी लगेचच त्याच्या शरीराचे तापमान मोजले. हा रुग्ण दगावला तर नव्याने सुरू झालेल्या या रुग्णालयावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असते. शिवाय, इतका तरुण रुग्ण गमावल्यामुळे नातेवाईकांचाही उद्रेक न आवरणारा ठरला असता. त्यावेळी डॉ. हर्डीकर यांनी आपला आजवरचा सर्व अनुभव पणाला लावत, जे जे शक्य होते ते सर्व काही उपचार केले. एका क्षणी रुग्णाने मान टाकली. त्याची जीभ निळी पडू लागली. डॉक्टरांनी ऑक्सिजन आणखी जलदगतीने सुरू केला. काहीकाळाने तो शुद्धीवर आला आणि बरा होऊन बाहेर पडला. त्यावेळी ‘गरवारे इन्स्टिट्यूट’तर्फे केईएम रुग्णालयात या अनुभवाबद्दल चर्चेसाठी खास डॉ. हर्डीकर यांना निमंत्रित केले होते.
 
 
 
या अनुभवानंतर त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. डॉक्टरांनी त्यानंतर प्रसुतिगृह आणि सरकारमान्य गर्भपात केंद्रही सुरू केले. त्यातच चिरंजीव डॉ. अभिजित यांच्या शिक्षणासाठी महाविद्यालयाची शोधाशोध सुरू झाली होती. नवी मुंबईतील तेरणा आणि ठाण्यातील डॉ. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला होता. मात्र, ठाण्यातल्या महाविद्यालयातच प्रवेश घेण्याचा निर्णय झाला. मात्र, मध्येच माशी शिंकली. वर्षभराचा अभ्यासक्रम शिकवल्यानंतर महापालिकेमध्ये रुग्णालय सुरू ठेवण्याबद्दल वाद सुरू झाले. एका आघाडीच्या वृत्तपत्रात महाविद्यालय बंद करण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र, अखेर त्या वृत्तपत्राच्या संपादकांची भेट घेत हा विषय समजावून सांगितला. त्यानंतर हा विषय काहीसा क्षमला. मात्र, हे महाविद्यालय बंद करण्याचा घाट काही उपद्रवींकडून सुरूच होता. कधी निधीची चणचण, तर कधी आणखी काही कारणे पुढे देऊन याबद्दल गोष्टी उकरून काढल्या जात होत्या. महापालिकेच्या माध्यमातून जन्माला घातलेल्या विद्येच्या बाळाचा गळा घोटण्याचे काम होत होते. याला एक सांघिक विरोध हवा म्हणून त्यांनी ’राजीव गांधी मेडिकल महाविद्यालय पालक संघ’ स्थापन केला. या माध्यमातून अनेक मुलांच्या पालकांना त्यांनी संघटित केले.
 
 
 
राजकीय पुढारी, महाविद्यालय प्रशासन, महापौर, नगरसेवक, पालिका प्रशासन आदींमध्ये हे महाविद्यालय सुरू ठेवण्यासाठी विशेष बैठक झाली. या बैठकीत पालक संघाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. हर्डीकर यांनी आपली बाजू लावून धरली. वैद्यकीय प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ होऊ देणारच नाही, अशी ठाम भूमिका पालक संघाने मांडली. हे महाविद्यालय सुरू ठेवण्यासाठी वर्षाकाठी अवघा तीन कोटी रुपये खर्च येणार होता. पालिका प्रशासन तितका खर्चही उचलू शकत नाही का, असा प्रश्न तत्कालीन ठाणे महापालिका विरोधी पक्ष नेते द्वारकानाथ पवार यांनी विचारला. शेकडो मुलांच्या भवितव्याची जबाबदारी पालिका घेणार का, असा सवाल तेथील लोकप्रतिनिधींना पालकसंघाच्या माध्यमातून विचारला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत हे महाविद्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि. १९ ऑगस्ट, १९९३ रोजी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मधुकर पाटील यांनी डॉक्टरांना महाविद्यालय सुरू ठेवणार असल्याचे पत्र दिले आणि ही लढाई जिंकल्याची पोचपावती मिळाली. आजही या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले पाहिजे, यासाठी लढा त्यांनी सुरू ठेवला आहे.
 
 
 
१९९४ मध्ये या समाजकार्यात असताना नगरसेवक निवडणुकीसाठीही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. डोंबिवलीत त्यांच्या राहत्या घराच्या आजूबाजूला त्यावेळी पालिकेने वृक्षलागवड सुरू केली होती. मात्र, उपद्रवींकडून या झाडांची नासधूस केली जात होती. डॉक्टरांनी सोसायटी आणि इतर स्थानिकांनी मिळून ‘रामचंद्रनगर रहिवासी संघ’ स्थापन केला होता. या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. तत्कालीन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त टी. चंद्रशेखर यांची भेट घेत त्यांनी आपले गार्‍हाणे मांडले. आयुक्तांनी याउलट वृक्षलागवड करण्याचा सल्ला स्थानिकांना दिला. मोबदल्यात प्रत्येक झाडामागे येणारा खर्च आणि मनुष्यबळ पालिका पुरवेल, असेही आश्वासन दिले. झाडे मात्र, प्रत्येक स्थानिकांकडून देणगी स्वरुपात गोळा करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच झाडांसाठी लागणार्‍या संरक्षण जाळ्यांसाठीही पैसे रहिवासी संघाला जमा करायचे होते. किमान ६० झाडे गोळा करण्याची अट पालिकेची होती. मात्र, स्थानिकांनी दाखवलेल्या विश्वासातून १२० झाडे देणगी स्वरुपात जमा झाली. रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लावण्याची जबाबदारी होती मिळालेली सर्वच्या सर्व झाडे जगलीसुद्धा. टी. चंद्रशेखरन यांच्या हस्ते या वृक्षलागवड मोहिमेचा समारोप झाला होता. डॉ. हर्डीकर आणि ‘रामचंद्रनगर रहिवासी संघा’चे सर्व कार्यकर्ते यांना १९९५ मध्ये स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पालिका आयुक्तांच्या हस्ते वृक्षसंवर्धन प्रोत्साहनात्मक कार्यक्रमात प्रथम पारितोषिकाने गौरवण्यात आले होते. तसेच १९९६ मध्ये डॉ. हर्डीकर यांना या कार्यासाठी ‘डोंबिवली वृक्षमित्र मंडळा’तर्फे ‘वृक्षमित्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
 
डॉ. हर्डीकर यांनी ‘महाराष्ट्र परिचर्या परिषद’, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या माध्यमातून राज्यस्तरावर सतत डॉक्टर आणि परिचारिकांसंदर्भातील प्रश्न वारंवार मांडले आहेत. राज्यातील ग्रामीण खेड्यापाड्यात परिचारिका पोहोचाव्यात, त्यादृष्टीने त्यांच्या शिक्षणातील जाचक अटी दूर करण्यासाठीचा त्यांचा लढा सुरूच आहे. ‘एएनएम’ (ऑग्झिलरी नर्स मिडवाईफ) परिचारिकांनाही रुग्णालयीन सेवेसाठी मान्यता द्यावी, ग्रामीण भारताला त्याची गरज आहे, यासाठीही प्रयत्न केले. २००१ मध्ये हॉटेल्स आणि रुग्णालयांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने लावलेल्या मनमानी नियमबाह्य पाणीदराविरोधातील खटलाही त्यांनी जिंकला. आपल्या प्रभागातील जनहितासंदर्भातील कामे सरकार दरबारी मांडून सोडवून घेण्यात त्यांचा कायम पुढाकार राहिला आहे. ज्याकाळी दूरध्वनीचे अटीतटीचे दिवस होते, त्यावेळेस ‘डोंबिवली दूरध्वनी ग्राहक संघा’चे कामही त्यांनी केले. या संघर्षाची बीजे बालपणातच रोवली गेली होती. वडील वामन शंकर हर्डीकर यांची ही संस्काररुपी शिकवण त्यांनी आयुष्यभर जोपासली. आयुष्यभर सेवाव्रत जपणार्‍या या डॉक्टरला सलाम...!
 
 
यशाचा मूलमंत्र
 
 
 
तुम्ही आपल्या वैयक्तिक जीवनात कुणीही असा मात्र, नागरिक म्हणून तुम्ही सजाण नसाल तर तुमच्या शिक्षणाचा, अनुभवाचा फायदा नाही. समाजातील तुमचा वावर हा तुम्हाला यशस्वी बनवत जातो.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@