मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांपुढे परीक्षा कशी द्यायची हा प्रश्न सर्वांपुढे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, "दहावी बारावी हा विद्यार्थ्यांसाठी आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे कोरोना काळात ही परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी अवघड होऊन बसेल. त्यामुळे बारावीची परीक्षा मे अखेरीस व दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे. बैठकीवेळी राज्यभरातील शिक्षणसंस्था, लोकप्रतिनिधी आणि अन्य घटकांनी दिलेल्या सूचना आम्ही मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या होत्या. त्यादृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात सोमवारी सकाळी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक बदलले जावे, अशी चर्चा दोन्ही मंत्र्यांमध्ये झाली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता लॉकडाऊनचा निर्णयही प्रलंबित आहे. अशा स्थितीत मुलांच्या निर्णयाबद्दल काय होणार, जर वेळापत्रक नव्याने ठरवले तर तेव्हाच्या परिस्थितीत परिक्षा कशा घ्यायच्या, असे प्रश्न सरकारपुढे उभे आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला परिक्षेच्या काळात कोरोनाची लागण झाली तर काय होणार, अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
ज्या प्रमाणे एमपीएससीच्या परीक्षांबद्दल निर्णय घेण्यात आला होता. तसाच निर्णय राज्यात दहावी बारावीच्या विर्द्यार्थ्यांबद्दल घेतला जाईल, अशी शक्यता या बैठकीनंतर व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत याबद्दलचे सुतोवाच केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल आणि आरोग्याबद्दल शिक्षण विभाग प्राधान्य देईल, असे आश्वासन त्यांनी केले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
दहावीची परीक्षा जूनमध्ये
दहावी बोर्डाच्या निर्णयाबद्दल शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, हा आमचा प्रयत्न असेल. त्यानुसार, दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेतल्या जातील, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. राज्य सरकारपुढे वेळेत निकाल लावणे, अकरावी आणि इतर शाखांमधील प्रवेश हे पुढील काळातील आव्हान असणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांची कोरोनापासून सुरक्षा हे देखील प्रमुख लक्ष्य असणार आहे.
बारावीची परीक्षा मे अखेर
मे महिन्याच्या अखेरपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. लवकरच दोन्ही वर्गांच्या नव्या वेळापत्रकांची घोषणा केली जाणार आहे. बारावीचे वेळापत्रक त्यानुसार जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.
अन्य मंडळांनाही हेच नियम लागू
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाने लागू केलेल्या निर्णयानुसार, इतर बोर्डांनीही अशाच पद्धतीने निर्णय घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निर्णय...