नालासोपारा : राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना आता हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नालासोपाऱ्यातील एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने एकूण १० जणांचा दिवसभरात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्या या रुग्णांना दिवसभर ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाल्याने आता या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
मृतांमध्ये बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक किशन बंडागळे यांचाही सामावेश आहे. पोलीसांनी मात्र, या आरोपाचे खंडन करत रुग्णांच्या नाजूक प्रकृतीमुळे हे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या प्रकारानंतर वसईचे महापौर राजीव पाटील यांनी हे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचे म्हटले आहे. त्यांची एक ऑडिओक्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना पत्रव्यवहार करून तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.
रुग्णालयात सायंकाळी एकूण दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर रुग्णालयात नातेवाईकांचा संताप अनावर झाला होता. तुळींज पोलीसांच्या सतर्कतेमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, सात रुग्ण दगावल्याच्या वृत्ताला रुग्णालयाने दुजोरा दिलेला नाही. रुग्णलयाचे व्यवस्थापक सागर वाघ यांनी दिवसभरात तीन मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच ज्यांनी रुग्णालयात धुडगूस घातला त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याची माहिती तुळींज पोलीसांनी दिली.