'सत्यशोधक' रुपेरी पडद्यावर येणार

    11-Apr-2021
Total Views | 99

satyashodhak _1 &nbs



महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

मुंबई : महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित 'सत्यशोधक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोषित पिडीतांसाठी जोतिरावांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. अंधश्रद्धेच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम जोतिरावांनी केले.
 
 
आपल्या प्रखर लेखणीच्या व स्वकार्य कर्तृत्वाच्या माध्यमातून जन-माणसात नवीन विचार पेरणाऱ्या जोतीरावानी शोषण कर्त्यांच्या विरोधात बंड पुकारलं. दुष्ट रूढी परंपराच्या गर्ततेत अडकलेल्या समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवून जोतीराव खऱ्या अर्थाने सत्य धर्माचे पथदर्शक ठरले. या अशाच अनिष्ट प्रथांच्या विरोधात सत्याचा शोध घेणारा आणि समानतेच्या वाटेवर चालणाऱ्या 'सत्यशोधक' धर्माची त्यांनी स्थापना केली.
 
 
अशा क्रांतिकारी महात्मा जोतीरावांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर हिंदी आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. समता फिल्म्स आणि पी बी इन्फ्रा यांच्या संयुक्त बॅनर अंतर्गत चित्रपट तयार होत आहे. गेल्या 3 वर्षा पासून 'सत्यशोधक' या ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीसाठी सर्व टीम अथक परिश्रम घेत आहे. चित्रपटामध्ये जोतीरावांच्या भूमिकेत संदीप कुळकर्णी, तर राजश्री देशपांडे सावित्री माईची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे ८० टक्के शूटिंग पूर्ण झाले असून, उर्वरीत चित्रीकरण येत्या मे महिन्यात शूट करण्यात येणार आहे.
 
 
 
विशेष म्हणजे चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत प्रदर्शीत होणार आहे. १९ व्या शतकाची सुरवात आणि तो काळ पडद्यावर साकारण्यासाठी मोठे भव्य सेट उभारण्यात आले असून, वी.एफ.एक्सच्या आधुनिक तंत्राचा देखील वापर करण्यात आला आहे. ''आपल्या कार्य कर्तृत्वाने 'महात्मा' पदावर पोहोचलेले जोतीराव आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांची साथ देणाऱ्या सवित्री माईचा संपूर्ण जीवन प्रवास थक्क करणारा आणि तितकाच प्रेरणादायी आहे. महात्मा फुले आणि त्यांचे संपूर्ण कार्य चित्रपटाच्या माध्यमातून साकार करणे आव्हानात्मक होते. चित्रपटातील प्रसंग बघताना प्रेक्षक त्यामध्ये गुंतून जातील.'' असे प्रतिपादन चित्रपटाचे लेखक - दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांनी केले.
 
 
''जोतिरावांच्या जीवनावर चित्रपट तयार करणे हे आमचे सामाजिक दायित्व आहे.'' असे समता फिल्म्सचे निर्माते प्रविण तायडे, अप्पा बोराटे यांनी म्हंटले असून, '' ही कथा हिंदी-मराठी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस येईल.'' असे मत पी बी इन्फ्राचे निर्माते पवन कुमार खोक्कर, भीमराव पट्टेबहादूर यांनी व्यक्त केले आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते बिंदर सिंग, विशाल वाहुरवाघ , प्रतीका बनसोडे यांनी खात्री दिली की, '' प्रेक्षकांच्या ह्या चित्रपटातून अपेक्षा नक्की पूर्ण होतील.''' सत्यशोधक' चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. समता फिल्म्स आणि पी. बी. इन्फ्रा कडून सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121