कालच्या सामन्यानंतर रोहितने चार षटकांत विजय खेचून आणला होता
अहमदाबाद (परिक्षित करंबेळे) : रोमहर्षक विजयानंतर भारताने इंग्लंड विरुद्धच्या पाच टी-20 सामन्यात बरोबरी साधली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे सुरू असलेल्या पाच टी-20 मालिकेत चौथा सामना चुरशीचा ठरला. भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडशी २-२, अशी बरोबरी केली.
नाणेफेक हरल्यानंतर पहिली फलंदाजी करत टीम इंडियाने आठ गडी बाद १८५ धावा केल्या. हे लक्ष्य गाठताना इंग्लडचा संघ २० षटकात १७७ धावापर्यंत मजल मारू शकला. भारताकडून सुर्यकुमार यादवने सर्वात जास्त ५७ धावा केल्या. सॅम करनच्या गोलंदाजीवर डेव्हिड मलानने त्याचा झेल घेतला. मात्र चेंडू मैदानाला लागल्याचे स्पष्ट दिसत असूनही मैदानावर दिलेला बादचा निर्णय थर्ड अंपायरने कायम ठेवला. क्रिकेटप्रेमींनी यावर नाराजी व्यक्त केली.
सामन्याच्या निर्णायक काळात केवळ चार षटकांत कर्णधार पदाची धुरा सांभाळत असताना हिटमॅन रोहित शर्माने नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. चार षटकांत रोहित शर्माने घेतलेल्या निर्णयामुळे इंग्लंडच्या संघाने गुडघे टेकले. आपल्या दमदार कामगिरीवर हातातून गमावलेल्या सामन्यात पुन्हा प्राण फुंकले. १६ व्या षटकानंतर कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेर गेला. त्यानंतर चार षटकांची जबाबादारी रोहित शर्मावर देण्यात आली आणि इथेच बाजी पलटली.
१६ व्या षटकासाठी रोहितने शार्दुल ठाकुरला गोलंदाजीसाठी पाचारण केले. षटकाला सुरुवात करण्यापूर्वी रोहित शार्दुलच्या कानात काही बोलला आणि पुढच्या क्षणाला त्याने बेनस्टोकचा विकेट घेतला. पुढील चेंडूत शार्दुल ठाकूरने इयोन मॉर्गनला वॉशिंग्टन सुंदरच्या हाती झेल देत बाद केले. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला होता. बेन स्टोक आणि मॉर्गन बाद झाल्यानंतर इंग्लंडचा संघ गडगडला. केवळ आठ धावांनी त्यांना हातात आलेल्या सामन्यावर पाणी सोडावे लागले होते. शार्दुल ठाकूरला पाचारण करण्याचा निर्णय घेतला नसता तर हा सामना व मालिका हातातून गमवावी लागली असती.
सुर्यकुमार यादवने दुसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुल सोबत २७ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार लावत असताना त्याचा आदिल रशीद याने झेल टीपला मात्र, त्याचा पाय सीमा रेषेला लागला. तरीही सुंदरला बाद ठरवण्यात आले. हा निर्णय सुद्धा भारतीय क्रिकेट प्रेमींना रुचला नाही. पुढील सामना २० मार्च रोजी होणार असून दोन्ही संघांसाठी 'करो या मरो'ची लढत ठरणार आहे.