नागरिक एकत्र आल्यामुळे कोरोनाचा उद्रेक
यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर पोहरादेवी गडावरील मंहंतांसह तब्बल 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक माहिती गुरुवार, दि. 25 फेब्रुवारी समोर आली.
पोहरादेवी येथील महंत कबीरदास महाराज यांचा कोरोना अहवाल गुरुवारी ‘पॉझिटीव्ह’ आला. कबीरदास महाराज यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. तर पोहरादेवी गडावरील अन्य काही जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले होते. यावेळी राठोड यांच्या समर्थनासाठी हजारोंच्या संख्येने लोक पोहरादेवी येथे जमले होते. राज्यात कोरोनाचे संकट असताना इतक्या मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आल्यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता ती शक्यता खरी ठरत असल्याचे चित्र आहे.
संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला, तसा आदेश दिला, तरीही राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे राठोड आणखी वादात सापडले. विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे नाराज झाले असून संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी, त्याकरता त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, याकरता मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला जात आहे.त्यामुळे आता मुख्यमंत्री हे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.