पूजा चव्हाण प्रकरणी 'या' प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी उत्तरे द्यावीत!

    25-Feb-2021
Total Views | 100

Pooja 1_1  H x
 
 



विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची मागणी




पुणे
: पूजा चव्हाण प्रकरणाला इतके दिवस उलटूनही एफआयआर दाखल झालेली नाही. पोलीसांनी सु-मोटोचा वापरही केला नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री व पोलीस खात्याला थेट प्रश्न विचारले आहेत. इतक्या महत्वाच्या प्रकरणात मंत्र्याचे नाव आल्यानंतर चालढकल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
 
 
दरेकर म्हणाले, "दि.७ फेब्रुवारी, २०२१ रोजी परळीतील युवती आणि सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाणचा पुण्यात संशायास्पद मृत्यू झाला. याच प्रकरणातील काही ऑडिओ क्लीप्स व्हायरल झाल्या. पूजा चव्हाण मृत्यूबाबत संशय निर्माण करणाऱ्या बाबी प्रथमदर्शनी निदर्शनास आल्या आहेत. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली होती. त्यानुसार चौकशी करू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
 
 
 
मात्र, नंतर अनेक संशय निर्माण करणाऱ्या, प्रकरणाशी संबंधित अनेक व्यक्ती असुरक्षित असल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, आतापर्यंत तपासाची प्रगती, वगैरे बाबत पोलिसांनी कोणतीही माहिती जनतेला दिलेली नाही. त्यामुळे जनतेमध्ये विशेषतः महिलांमध्ये भीतीचे, असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्या आणि जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. किमान आपणांपैकी कुणीही याबाबत तातडीने जनतेला अवगत करावे."
 
 
 
मुख्यमंत्री उत्तर देणार का ?
 
१. दि.७ फेब्रुवारी पासून २४ फेब्रुवारीपर्यंत १७ दिवस झाले प्रमुख साक्षीदार, या घटनेतील महत्वाचा दुवा अरुण राठोड बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करीत आहेत ?
 
 
२. अरुण राठोड याला बेपत्ता कोण करू शकतो, याबाबत काही व्यक्ती संशयाच्या फेऱ्यात आहेत, त्यांच्याकडे पोलिसांनी आता पर्यंत चौकशी का केली नाही ?
 
 
३. अरुण राठोड याचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या गावातून बेपत्ता झाले आहेत, अरुण राठोड व त्याच्या कुटुंबाचे काही बरेवाईट झाले किंवा कसे, अशी भीती जनतेच्या मनात निर्माण झाली आहे? १७ दिवसात त्यांचाही शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. याबाबत पोलीस नेमकी काय कार्यवाही करीत आहेत ?
 
 
४. अरुण राठोड याच्या मूळ गावी असलेल्या घरात चोरी झाली असून याची चौकशी पोलिसांनी केली आहे का?
 
 
 
५. घटना घडून आणि ऑडिओ क्लिप उघड होऊन १७ दिवस झाले आहेत. पोलिसांनी याबाबत कुणाची चौकशी केली, केली किंवा नाही, प्रमुख संशयित व ज्यांचा आवाज या क्लिपमध्ये आहे, ऑडीओ क्लिप मध्ये असलेल्या आवाजाची फॉरेंसीक चाचणी पोलिसांनी का केली नाही?
 
 
 
६. मृत पुजा चव्हाण यांचे कुटुंबीय प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसत आहेत. ते असुरक्षित असल्याचेही लक्षात येत आहे. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्यक्रम असा जयघोष करणारे सरकार त्यांना सुरक्षितता देणार आहे का ?
 
 
 
७. अरुण राठोड व एक महिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी दाखल झाले होते, त्या महिलेच्या नावाची नोंद पूजा चव्हाण या नावाशी मिळतीजुळती आहे. याचाही पोलीस तपासात फायदा होणार आहे. पोलिसांनी याबाबत चौकशी केली आहे का ? याबाबत यवतमाळ जिल्हा रुग्णालयातील सी.सी. टिव्ही फुटेज तपासणे आवश्यक वाटते.
 
 
 
८. हिडीओ क्लिप मध्ये ज्यांचा आवाज आहे, ज्यांच्या बद्दल पूजाच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे, त्या मंत्री मंडळातील संबंधित मंत्र्यांची चौकशी तातडीने करणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष पोलिसांकडून का केले गेले ?
 
 
 
९. खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी करोनाच्या काळजीपोटी यात्रा, सभा, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे, जनसामान्य त्याचे पालन करीत आहेत, जर कोरोना विषयक खबरदारी पाळली नाही तर लॉकडाऊन करू, अशी धमकी मुख्यमंत्री जनतेला देत आहेत ? साधी मास्क नसेल तर २०० रुपयांचा दंड सामान्यांकडून मुख्यमंत्री वसूल करतात. अशा परिस्थितीत १७ दिवस लपून बसलेले मंत्रिमंडळातील एक मंत्री पोहरादेवी येथे शक्ती प्रदर्शन करतात, लाखोंचा जमाव जमवतात, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात, त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे का, किंवा मुख्यमंत्री त्यांना कोणता दंड करणार आहेत ?
 
 
१०. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याच्या दबावामुळे पोलीस तपास प्रभावित झाला आहे का?
 
 
 
११. संशयित मंत्री यांच्यापर्यंत १५ दिवस पोलीस पोहोचले नाही, पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा संशय - जनतेच्या मनात आहे, याबाबत वस्तीस्थिती काय आहे ?
 
 
 
१२. मंत्री मंडळातील मंत्री १५ दिवस गायब होतो, ते कुठे आहेत, का लपले आहेत, याची चौकशी मुख्यमंत्री म्हणून आपण केली का, असेल तर त्याची माहिती आपण जनतेला देणार का ?
 
 
 
"विरोधी पक्ष नेता म्हणून मला, महाराष्ट्रातील जनतेला या प्रश्नांची उत्तरं हवीत, पोलीस महासंचालक म्हणुन आपण पोलीस प्रशासनाचे प्रमुख आहात. मृत पुजा चव्हाण तपास प्रकरणी होत असलेल्या चाल ढकलीमुळे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये असंतोष आहे. तरी प्रकरणी निर्माण झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाणे तात्काळ तपास मृत तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवूण द्यावा", अशी विनंती त्यांनी केले.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121