अमरावती : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता अमरावतीत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना राज्यात अनलॉकनंतर पहिला लॉकडाऊन हा अमरावतीत जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीत सोमवार संध्याकाळी ८ वाजल्यापासून अमरावती शहर, अचलपूर शहरात पुढील आठवडाभर कडक लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दुपारी ४ वाजता केली आहे.
अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. "सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी याचं पालन करावं. आम्हाला आता नाईलाजास्तव फक्त जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. इतर सारंकाही पूर्णपणे बंद असणार आहे. तसेच शहरातील बाजार हे गाईडलाइन्सनुसारच सुरू राहतील", असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये गत काही दिवसांपासुन कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगर पालिका , आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या लक्ष केंद्रित करुन कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.अमरावतीत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी यशोमती ठाकूर यांनी आज एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीआधीच ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं.
अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात १२ कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना १४ दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या १२ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला. अमरावती मनपा हद्दीत सध्या २ ,७८३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. तर अमरावती जिल्ह्यात आज तब्बल ७२७ रुग्ण पॉझिटीव्ह आढळूण आले आहेत. आज २ ,१३१ रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर ३४.११ टक्क्यांवर पोहोचला. आज एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४६०रुग्णांचा मृत्यू झाला आहे