‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’चे विश्वस्त विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांची माहिती
बंगळुरु: अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी सुरू करण्यात आलेल्या निधी समर्पण अभियानाला देशातील नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे एक हजार कोटींचा निधी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे जमा झाल्याची माहिती ट्रस्टचे एक विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी बुधवार, दि. १० फेब्रुवारी रोजी दिली.
विश्वस्त विश्वप्रसन्न महाराज म्हणाले की, “जनतेने या मोहिमेला देलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे. निधी गोळा करण्याच्या कामासाठी मी मोठा प्रवास केला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या प्रकल्पासाठी मदत दिली. निधीमध्ये वाढ होणे ही मंदिर निर्माणासाठी काम करणार्या संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्त्वाची बाब आहे. अयोध्येत मंदिर उभारायचे आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच न्यासाचा उद्देश नाही. पुढे जात रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचे या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “राज्यातील सर्व मंदिरे ही संरक्षित करणे गरजेचे आहे. कारण यामुळे मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण करण्याचा कोणी विचार करणार नाही आणि त्यामुळे भविष्यात वाद होणार नाहीत.”
राजस्थानमध्ये राम मंदिरासाठी देणगी जमा करणार्या संघाच्या जिल्हा संचालकावर गोळीबार
राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संचालकावर गोळ्या झाडण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री राजस्थानमधील कोटा येथे घडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक दीपक शाह राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र, काही समाजकंटकांनी दीपक शाह यांना देणगी गोळा करण्यापासून रोखले. परंतु इशारा देऊनही दीपक शाह यांनी आपले काम सुरूच ठेवले. यानंतर शाह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
दीपक शाह यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या गोळीबारादरम्यान शाह यांच्या पायाला दोन गोळ्या लागल्या. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर कोटा येथील रामगंज मंडी भागातील झालवाडामधून तीन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.