मुंबई : गेली अनेक वर्षे मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने आपल्या अभिनयाने मराठीच नव्हे तर आता हिंदी चित्रपटांमध्येदेखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेटफ्लिक्सवर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'बॅाम्बे बेगम्स' या वेब सिरिजमध्ये अभिनेत्री अमृता सुभाषसोबत पूजा भट्ट, आध्या आनंद, प्लाबिता बोरठाकुर, शाहाना गोस्वामी अशा तगड्या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या. यामधील अमृता सुभाषच्या भूमिकेसाठी तिला 'एशियन अॅकॅडमी क्रिएटीव्ह पुरस्कार' सोहळ्यात 'सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कार देण्यात आला.
यासंदर्भातील एक व्हिडियो शेअर करत तिने म्हंटले आहे की, "हा माझा पहिला आंतराष्ट्रीय पुरस्कार. माझ्या बॅाम्बे बेगम्सच्या टीमचे आभार. या एशियन पुरस्कारासाठी भारताचं प्रतिनिधित्व करणं हा भारावून टाकणारा अनुभव होता." अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. मराठीसह हिंदी कलाकारांनी तिच्या या कामगिरीचे चांगलेच कौतुक केले आहे. पुढे तिने म्हंटले आहे की, "एशियन अॅकॅडमी क्रिएटीव्ह पुरस्कारांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची ऑनलाइन कॅानफरन्स होती. योको नाराहाशी या जपानमधल्या कास्टींग डीरेक्टरने आम्हा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची मुलाखत घेतली. भारतातून मी आणि कोंकणा सेन शर्मा यांनी या कॅानफरन्समधे भाग घेतला."
अमृता सुभाष ही गेली काही वर्ष मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करते आहे. 'श्वास' या मराठी चित्रपटापासून तिला अभिनय क्षेत्रात खरी ओळख मिळाली. पुढे तिने अनेक संवेदनशील चित्रपटांमध्ये आपली प्रत्येक भूमिका चोख पार पाडली. मराठीसह हिंदीमध्येही तिने चांगली ओळख निर्माण केली आहे. रणवीर सिंहच्या गली बॉयमध्ये अमृता मुरादच्या आईच्या भूमिकेत दिसली होती, तर तिने नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स २ या मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. नुकतेच धमाका चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका निभावली होती.