१२ ख्रिस्ती कुटूंबियांनी स्वीकारला हिंदू धर्म
आणखी २२ कुटूंब करणार "घरवापसी"!
27-Dec-2021
Total Views | 285

औरंगाबाद : पैठणच्या नाथ मंदिरात शनिवार, दि. २५ डिसेंबर रोजी १२ ख्रिस्ती कुटूंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. १२ कुटूंबातील एकूण ५३ जण या सोहळ्याला उपस्थित होते. ब्राह्मण सभेने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदूधर्म शास्त्रानुसार हे कार्य संपन्न केले, अशी माहिती दिली.
नाथवंशज आणि धर्मजागरण विभागाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जालन्यातील मंठा येथे १२ कुटुंबांतील ५३ महिला आणि पुरुषांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारता येईल का?, अशी इच्छा व्यक्त केली होती. स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारायचा असल्याने ब्राह्मणसभेने पुढाकार घेत विधी करण्याचे नियोजन करण्यात आले.
तसेच नाथमंदिरातील शांतीब्रम्ह नाथमहाराजांच्या समाधीपुढे हा सोहळा पार पडला. “संत एकनाथ महाराजांचे १४ वे आणि १५ वे वंशज, पैठणचे वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृंद यांची यावेळी उपस्थिती होती”, असे पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश कमलाकर शिवपुरी यांनी सांगितले.
हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या सर्व परिवारांचे स्वागत आणि पूजन हभप नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी (पालखीवाले) आणि किर्तनमहर्षी प्रफुल्लबुवा तळेगावकर महाराज यांनी केले.
आणखी २२ कुटुंबांनी व्यक्त केली इच्छा...
मंठा या ठिकाणच्या अन्य २२ ख्रिश्चन कुटुंबातील ६५ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या इच्छेनुसार येत्या ५ जानेवारी रोजी धार्मिक मुहुर्तावर पैठणच्या नाथमंदीरातच या कार्याचे आयोजन केले आहे. यातही ब्राह्मणसभा पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे.