'ओमिक्रॉन'चा भारतात शिरकाव; कर्नाटकात सापडले २ रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद

    02-Dec-2021
Total Views | 223
omicron_1  H x
 
 
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. याचा धोका लक्षात घेता भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक १५ डिसेंबरपर्यंत बंद केली होती. असे असतानाही भारतामध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिव अग्रवाल यांनी सांगितले आहे की, "ओमिक्रॉन व्हेरीयंट सापडलेल्या सर्व रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. दरम्यान, देशातील आणि जगभरातील अशा सर्व रुग्णांमध्ये आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. कर्नाटकात ६६ आणि ४६ वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. मात्र, घाबरण्याचे कोणतेही कारण नसून सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे."
 
 
पुढे त्यांनी सांगितले की, "एका महिन्यापासून देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. १५ जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्हचे प्रमाण अजूनही १०% पेक्षा जास्त आहे ही चिंतेची बाब आहे. १८ जिल्ह्यांत ते ५ ते १०% राहते. केरळ आणि महाराष्ट्र ही दोनच राज्ये आहेत जिथे १०,०००पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. देशातील ५५% पेक्षा जास्त प्रकरणे येथे आहेत. ४९% लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे ९९,७६३ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ९,७६५ नवीन रुग्ण आढळले आहेत."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121