मुंबई : भारतीय संघाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. बीसीसीआयने रोहित शर्माला टी २० नंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद दिले आणि विराट कोहलीबद्दलच्या अनेक वावड्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. तसेच विराट आणि इतर खेळाडूंमध्ये काही आलबेल नसल्याचेदेखील बोलण्यात आले. दरम्यान, आता भारतीय कसोटी संघ हा लवकरच दक्षिण आफ्रीकेसाठी रवाना होणार आहे. त्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार विराट कोहलीने या बातम्या खोडून काढत, वावड्या उठावणाऱ्यांची जणू काही शाळाच घेतली. यासर्व अफवा असून असा काहीही होत नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यासाठी निघण्याआधी विराट कोहलीची एक पत्रकार परिषद झाली. एका पत्रकाराने या बातम्यांबाबत विचारल्यानंतर त्याने म्हंटले की, "या प्रकारचे वृत्त लिहिणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या सूत्रांना तुम्ही हे प्रश्न विचारा. ही सर्व मंडळी विश्वासर्ह नाहीत. एकदिवसीय संघासाठी मी नेहमीच उपलब्ध होतो आणि आहे. विश्रांती संदर्भात माझे बीसीसीआयशी कोणतेही बोलणे झालेले नाही. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेसाठी मी उपलब्ध आहे." असे त्याने स्पष्ट केले आहे. तसेच व्हाईट बॉल क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्यावर विराटने म्हंटले की, "मला टी २०चे कर्णधारपद सोडायचे आहे, हे मी बीसीसीआयला सांगितले. त्यांनी ते मान्यही केले होते. एकदिवसीय आणि कसोटीमध्ये नेतृत्व करण्याची इच्छा आहे, हे मी तेव्हा सांगितले होते."
रोहित शर्मा एकदिवसीय कर्णधार म्हणून घोषणा होण्याआधी तास-दीड तास आधी विराट कोहलीला कळवण्यात आले. यावर त्याने सांगितले की, "आफ्रिका दौऱ्याच्या कसोटी संघाची निवड करण्याच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क करण्यात आला. कसोटी संघावर चर्चा झाली फोन ठेवण्याच्या पाच मिनिट आधी पाच निवड समिती सदस्यांनी मला सांगितले की मी वनडे संघाचे नेतृत्व करणार नाही. निवड समितीचा तो निर्णय मी तेव्हाच मान्य केला." रोहित शर्मा सोबत वादांच्या बातम्यांवर कोहलीचे सडेतोड उत्तर देत म्हनला की, "रोहित आणि माझ्यामध्ये कोणतेही वाद नाहीत. रोहित शर्मा एक सक्षम कर्णधार आहे. गेल्या २ वर्षांपासून मी हेचा सांगून आता थकलो आहे. दुखापतीमुळे रोहित कसोटीत नसला तरीही त्याच्या अनुभवाची कमतरता आम्हाला नक्कीच जाणवेल."