मुंबई - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी एसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर केलेल्या वक्तव्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. वानखेडे यांच्या वडिलांनी मलिक यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. याच प्रकरणावरील सुनावणीदरम्यान मलिक यांनी माफी मागितली.
आपण वानखेडे कुटुंबाविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, असे आश्वासन त्यांनी न्यायालयाला दिले होते. मात्र तरीही त्यांनी टीका केली. अशा स्थितीत न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. या प्रतिज्ञापत्रात, न्यायालयाने त्यांना ज्ञानदेव वानखेडे आणि कुटुंबाविरुद्धच्या विधानांबाबतच्या (न्यायालयाच्या) पूर्वीच्या आदेशांचे "इच्छापूर्वक उल्लंघन" केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये हे स्पष्ट करण्यास सांगितले होते.
या नोटिशीनंतर मलिक यांनी न्यायालयात दिलेल्या निवेदनात न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. आदेशांचे उल्लंघन करण्याचा आपला हेतू नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठीच असे उल्लंघन झाल्याचे ते म्हणाले. आपल्या तीन पानांच्या प्रतिज्ञापत्रात मलिक म्हणालेत, "तथापि, मला विश्वास आहे की माझे विधान मला केंद्रीय एजन्सींच्या राजकीय गैरवापरावर आणि त्यांच्या कर्तव्यादरम्यान त्यांच्या अधिकार्यांच्या वर्तनावर भाष्य करण्यापासून परावृत्त करणार नाही." हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर वानखेडे यांचे वकील बिरेंदर सरफ यांनी शेवटच्या ओळींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले की, मलिकांच्या राजकीय विषयांवर बोलण्यावर काही हरकत नाही आहे. फक्त वानखेडेबद्दल बोलू नये.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नवाब मलिक यांनी मांडलेला माफीनामा मान्य करत पुढील निर्देश देण्याची गरज नसल्याचे सांगितले. मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर वानखेडे, त्याच्या वडिलांसह विधाने केली होती. अशा परिस्थितीत ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला.