धर्मांधांचा हैदोस!

महाराष्ट्रात काश्मीरसारखी दगडफेक आणि बंगालसारखा हिंसाचार

    13-Nov-2021
Total Views | 290

maharastra_1  H

हिंगोली, परभणी, भिवंडी, अमरावतीमध्येही ‘बंद’चे तीव्र पडसाद

नाशिक : त्रिपुरा राज्यात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांवर होत असलेले कथित हल्ले आणि धर्मगुरूंबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ काही धार्मिक संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनास शुक्रवारी राज्यात हिंसक वळण मिळाले. या आंदोलनादरम्यान मालेगाव येथे काही धर्मांधांनी हैदोस घातला. यावेळी दगडफेक करत काही समाजकंटकांनी हिंसाचार घडवून आणला. या जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्ले करण्यापर्यंत हल्लेखोरांची मजल गेली. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आल्याचे समजते. केवळ मालेगावमध्येच नाही तर नांदेड, हिंगोली, परभणी, भिवंडी आणि अमरावती येथे पुकारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यानही हिंसात्मक घटना घडल्याने पुरोगामी महाराष्ट्रात शुक्रवारी काश्मीरसारखी दगडफेक आणि बंगालसारखा हिंसाचाराचे घडल्याचे चित्र होते.
त्रिपुरा येथे अल्पसंख्याक समाजातील नागरिकांवर होत असलेले कथित हल्ले आणि धर्मगुरूंबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ रजा अकादमीसह काही इतर धार्मिक संघटनांकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. दुपारपर्यंत हा ‘बंद’ शांततेतच सुरू होता. मात्र, या ‘बंद’ला मालेगावात हिंसक वळण लागले. ‘बंद’चे आवाहन करणाऱ्या जमावाकडून यावेळी दगडफेक करण्यात आल्याचा आरोप स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकडून केला जात आहे. मालेगावातील किदवाई मार्गावरील ‘शहीद टॉवर’ परिसरात काही जणांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी घोषणा देत तरूणांनी परिसर दणाणून सोडला. या घटनेने शहरात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे, पोलीस निरीक्षक धुसर आदी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी घटनास्थळी पाचारण झालेल्या शीघ्र कृतीदलाच्या जवानांसह वाहनांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी लोखंडी जाळ्या लावून नाकेबंदी केली असता तरूणांनी जुन्या आग्रा रोडवर व्यापारी संकुलाकडे कूच करत दगडफेक सुरू केल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाठीमार करत जमावास पिटाळून लावले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
नांदेड
नांदेड शहरातदेखील याचे पडसाद उमटले. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. व्यावसायिकांची दुकाने आणि खासगी वाहनांसह पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.
भिवंडी
भिवंडीतही त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ ‘बंद’ पुकारण्यात आला होता. या ‘बंद’ला ‘एमआयएम’, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर शहरातल्या बाजारपेठा शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
अमरावती
अमरावतीतदेखील त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली होती. मात्र, यासाठी कुठलीही परवानही घेण्यात आली नसल्याची माहिती असून मोर्चेकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
हिंगोली
हिंगोली शहरातदेखील आपली दुकाने बंद ठेवून त्रिपुराच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील भाजिमंडी परिसरात शुकशुकाट बघायला मिळाला. जिल्ह्यातील कलमनुरी शहरातदेखील आपली आस्थापने बंद ठेवून निषेध नोंदवला.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
“मालेगाव येथील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्या ठिकाणी पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा,” असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
पालकमंत्र्यांकडून शांतता पाळण्याचे आवाहन
पालकमंत्री छगन भुजबळ याबाबत म्हणाले की, “मालेगावमध्ये अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. कोणी काहीही बरळतील त्यावर विश्वास ठेऊ नये. कोरोनानंतर आता कुठे आनंदी वातावरण आहे. त्यामुळे कृपया डोके गरम करून घेऊ नका, शांतता राखा. पोलिसांना सहकार्य करा. पोलीस त्यांचे काम करतील. आपल्या कृतीमुळे कुठल्याही संकटात वाढ होणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घ्या,” असे सांगत मालेगावमध्ये शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121