नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात ‘जेएनयु’मध्ये आयोजित भारतविरोधी ‘वेबिनार’ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) तीव्र विरोधानंतर अखेर रद्द करण्यात आले आहे. सदर ‘वेबिनार’मध्ये ‘काश्मीरवर भारताचा कब्जा’ असा देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरोधी उल्लेख करण्यात आला होता.
‘जेएनयु’च्या ‘सेंटर फॉर वुमन स्टडिज्’तर्फे ‘जेंडर्ड रेझिस्टन्स अॅण्ड फ्रेश चॅलेंजेस इन पोस्ट 2019 काश्मीर’ या विषयावरील ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यासाठी तयार केलेल्या पोस्टरमध्ये ‘काश्मीरवर भारताचा कब्जा’ (इंडियन ऑक्युपेशन इन काश्मीर) असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला होता.
सदर पोस्टर समाजमाध्यमांवरूनही सार्वत्रिक करण्यात आले होते. त्यास अभाविप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करून कार्यक्रमाचे पोस्टर्स जाळले. ‘अभाविप-जेएनयु’ सचिव रोहित कुमार यांनी संबंधित विभाग, संबंधित विभागाचे विभागप्रमुख आणि ’जेएनयु रजिस्ट्रार’ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे ‘जेएनयु’मधील डाव्या विचारांची टोळी काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी नेहमीच अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करीत असल्याचेही रोहित कुमार यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ‘जेएनयु’ प्रशासनाची परवानगी न घेता सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये वापरण्यात आलेला ‘काश्मीरवर भारताचा कब्जा’ हा शब्द अतिशय आक्षेपार्ह आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.