तपासी अधिकाऱ्यास वैयक्तिक लक्ष्य करणे हे अत्यंत चुकीचे
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : मुंबईसह महाराष्ट्राला पडत असलेला ड्रग्जचा विळखा ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यास विरोध करण्याऐवजी संजय राऊत हे ड्रग्जवाल्यांची वकिली करीत आहेत का, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लगाविला.
आर्यन खान ड्रग्जप्रकरणी सुरू असलेल्या वादंगाविषयी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्राला सध्या ड्रग्जचा विळखा पडत असल्याची स्पष्ट झाले आहे. राज्यातील तरूण पिढी ड्रग्जमुळे बरबाद होत आहे. मात्र, तरीदेखील त्यास विरोध न करता संजय राऊत त्याचे समर्थन करत असतील तर हे अतिशय गंभीर आहे. यामुळे संजय राऊत हे ड्रग्जवाल्यांची वकिली करत आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे. मूळ मुद्द्यावरून लक्ष वळविण्यासाठी संजय राऊत हे दररोज नवनवे आरोप करत आहेत, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याची गरज वाटत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
तपासी अधिकाऱ्यास वैयक्तिक लक्ष्य करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. वानखेडे यांच्याविरोधात घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीकडे पुरावे असतील तर ते त्यांनी न्यायालयात सादर करावेत. मात्र, वानखेडे यांच्या पत्नीनेही सर्व प्रकारचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक वाद निर्माण करून संबंधित अधिकाऱ्यास प्रकरणाचा तपास करण्यापासून दूर करण्याचे तर षडयंत्र नाही, याचाही विचार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वानखेडे यांच्यावरील आरोपांची संबंधित विभाग चौकशी करून निर्णय घेईल, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.