दुबई : गेली ९ वर्षे विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्त्व करत आहे. मात्र, नेहमीप्रमाणे आयपीएल २०२१मध्येही पुन्हा एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली. विराटचा शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) आरसीबीला पराजित केले. यामुळे आता आरसीबीचा प्रवास चौथ्या स्थानावरच थांबला आहे. कर्णधार म्हणून विराटचा हा शेवटचा सामना होता. या सामान्यानंतर विराट आणि एबी डिव्हीलीयर्सलादेखील आपले रडू आवरले नाही.
कर्णधार म्हणून संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्याचे विराटचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतरचे हे दु:ख विराटच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागले होते. सामना संपल्यानंतर विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये तो इतर खेळाडूंशी संवाद साधत असताना ढसाढसा रडला. गेल्या १३ वर्षांपासून विराट ही एक चषक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रत्येक वेळी त्याला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. विराटच्या संघाने ३ वेळा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. पण प्रत्येक वेळी इतर संघाने आरसीबीला पराभूत करून चषक मिळवले आहेत.