उत्तर कोरिया पश्चिमेकडे?

    14-Jan-2021   
Total Views | 102

North Koera_1  
 
 
कोरियन द्विपकल्पाची फाळणी होऊन स्वतंत्र उत्तर कोरिया अस्तित्वात आल्यापासून त्या देशाने कम्युनिस्ट विचारसरणीचा अंगीकार करत रशिया, चीन आदी देशांशी दृढ संबंध प्रस्थापित केले. किंबहुना रशिया, चीन व अन्य कम्युनिस्ट देशांच्या पाठबळानेच अमेरिका व अमेरिकेने समर्थन दिलेल्या दक्षिण कोरियासमोर उत्तर कोरिया उभा ठाकला.
 
 
 
मात्र, गेली ७२ वर्षे उत्तर कोरियाने रशिया, चीनशी कम्युनिस्ट विचारसरणीच्या आधारावर जोपासलेले निकटचे संबंध यापुढेही तितक्याच ताकदीचे राहतील का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याला कारण उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या अलीकडच्या काळातील कृती. त्यावरून उत्तर कोरिया चीनपासून अंतर राखून पाश्चिमात्त्य देशांशी उत्तम संबंध निर्माण करू इच्छितो, असे दिसते. उत्तर कोरियाची विचारसरणी आणि अर्थव्यवस्थेतील विस्ताराच्या आवश्यकतेसह आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यातील अपयशावर किम जोंग उन चर्चा करताना दिसतात. तसेच आम्ही चीनला रोखण्यासाठी तयार आहोत. पण, त्याबदल्यात उत्तर कोरियाला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी, अशी किम जोंग उन यांची अपेक्षा असल्याचे दिसते.
 
 
नुकत्याच झालेल्या सत्तारूढ पक्षाच्या बैठकीवेळी किम जोंग उन यांनी देशाला अण्वस्त्रसंपन्न करण्याच्या योजनेचा पुनरुच्चार केला होता. सोबतच त्यांनी उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था सुरळीत चालण्याबाबत विधान केले होते. एखादा कम्युनिस्ट देश अर्थव्यवस्था सुधारण्याचा विचार करत असेल, तर ते तेवढ्यापुरतेच मर्यादित राहत नाही, तर तो देश मोठ्या परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हणावे लागते. इतकेच नव्हे, तर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांच्या भगिनी किम यो जोंग यांची दक्षिण कोरियाच्या संदर्भाने असभ्य भाषा वापरल्याचा ठपका ठेवून पदावनती केल्याची घटनाही नुकतीच घडली. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, घसरत्या अर्थव्यवस्थेमुळे किम जोंग उन यांच्यावर दबाव आहे.
 
 
तसेच देशाची आर्थिक विकास योजना जवळपास सर्वच क्षेत्रात अपयशी झाल्याचे त्यांनी स्वतःदेखील मान्य केले आहे. मागील पाच वर्षे अभूतपूर्व आणि सर्वाधिक वाईट असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले होते. अर्थात, त्यांचे म्हणणे निराधार ठरत नाही, कारण चीनच्या हातातली कठपुतळी होत त्या देशाच्या इशार्‍यावर उत्तर कोरियाने जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेविरोधात सातत्याने आक्रमक धोरण अवलंबले.
 
 
तथापि, चीनच्या समर्थनाची भूमिका घेऊनही उत्तर कोरियाचा विशेष फायदा झाला नाही. कोरोनामुळे संघर्षाची परिस्थिती आलेली असतानाच उत्तर कोरिया व चीनमधील व्यापारातही गेल्या वर्षी मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. किम जोंग उन यावरच, “उत्तर कोरियासमोर निर्माण झालेल्या आर्थिक समस्या चालू काळातील चुकीचे वैचारिक दृष्टिकोन, बेजबाबदार भूमिका, अक्षमता आणि निरर्थक कार्यपद्धतीमुळेच असू शकतात,” असे म्हणाले. त्यांच्या या विधानावरून उत्तर कोरियाचा केवळ चीनच नव्हे, तर कम्युनिस्ट विचारसरणीकडूनही अपेक्षाभंग झाल्याचेच दिसून येते.
 
 
दरम्यान, उत्तर कोरियाने सातत्याने दक्षिण कोरिया व अमेरिकेबरोबरील तणाव कमी करण्याचेही संकेत दिले व किम यो जोंग यांच्या पदावनतीतूनही त्यांनी तोच संकेत दिला. “ते (दक्षिण कोरियाई) मूर्ख आहेत आणि गैरवर्तणुकीत त्यांचा क्रमांक जगात अव्वल आहे,” असे किम यो जोंग म्हणाल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे, दक्षिण कोरियाई अधिकार्‍यांच्या उत्तर कोरियाच्या होऊ घातलेल्या लष्करी परेडवर नजर ठेवण्याचे वृत्त आल्यानंतरच त्यांनी हे विधान केले होते व त्यावरून त्यांना पदावरून हटवले गेले.
 
 
 
किम यो जोंग यांना दूर करण्याला उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्याकडून जगासाठीची सदिच्छा समजता येईल. सोबतच आम्ही दक्षिण कोरियाच्या अधिकार्‍यांविरोधात आवश्यकतेशिवाय अनावश्यक आक्रमक होणार नाही, असेही ते सांगू इच्छितात. दुसरीकडे किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रक्षमतेला बळकटी देण्याचेही विधान केले.
 
 
काहीही होवो, उत्तर कोरिया अण्वस्त्रशक्ती होऊनच दाखवेल, असे त्यांना म्हणायचे आहे. तथापि, जगातील अन्य देशांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांना धोका मानू नये, असेही त्यांना वाटते. या दोन्ही घटनांवरून अंदाज करता येतो की, किम जोंग उन चीनविरोधात पाश्चिमात्त्य देशांच्या साथीने सहकार्यासाठी तयार आहेत, अट इतकीच की उत्तर कोरियाला अण्वस्त्रशक्ती म्हणून स्वीकारले पाहिजे.


महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121