तथाकथित विचारवंतांची चिडीचूप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2021
Total Views |
EDIT_1  H x W:
 
 
 
 
आज ‘मालंकरा ऑर्थोडॉक्स चर्च’मधील महिलांनी आपल्यावरील लैंगिक अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवला तर पुरोगामी विचारवंतांतला एकही माईचा लाल त्यांच्या समर्थनासाठी पुढे आला नाही. अथवा ख्रिश्चन चर्च, तिथल्या पाद्री, बिशप वगैरे धर्मव्यवस्था-धर्मसत्तेला घंटा वाजवत जाब विचारण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही.
 
 
 
जीवन जगताना माणसाकडून दररोज असंख्य चुका होतात. कधी त्या लहान, फारशी इजा न पोहोचवणार्‍या, कमी गंभीर असतात, तर कधी दुसर्‍या कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या! पापभिरु माणूस अशा चुकांनंतर मनातल्या मनात कुढत बसतो, तसेच आपण केलेल्या चुकांवर पश्चात्ताप करत सर्वशक्तिमान परमेश्वरापुढे क्षमाही मागतो. अशीच एक परंपरा ख्रिश्चन धर्मातही पाळली जाते नि तिलाच ‘कन्फेशन’ असे म्हणतात. जीवनात केलेल्या चुका किंवा पापांची कबुली देत, ख्रिश्चन धर्मानुयायी चर्चमध्ये जाऊन माफी मागतात आणि येशूख्रिस्त मोठ्या मनाने आपल्याला क्षमा करेल, अशी त्यांची भावना असते. मात्र, ही पापांची कबुली व पापांचे प्रायश्चित्त ईश्वराचा प्रतिनिधी मानल्या जाणार्‍या फादर किंवा पाद्रीसमोरच मागितली जाते.
 
 
 
अर्थात, ख्रिश्चन धर्मानुयायांचा चर्चमधील पाद्रींवरही नक्कीच गाढा विश्वास असेल, म्हणून तर ते आपल्या मनात दाबून ठेवलेल्या, कोणालाही न सांगितलेल्या चुकांची, पापांची जाहीर कबुली त्याच्यासमोर देतात. आपण आपल्या पापांची कबुली दिली, परमेश्वराचा दूत असलेल्या पाद्रीने ती ऐकली, आता तो येशूख्रिस्ताकडे आपल्याला माफ करण्यासाठी प्रार्थना करेल आणि दयासागर परमपिता आपल्याला क्षमा करेल, इतक्या विश्वासाने ही सगळी प्रक्रिया पार पडत असते. पण, जगातल्या अन्य कोणत्याही व्यक्तीपेक्षा चर्चमधील पाद्रीवर विश्वास ठेवला, त्या शुभ्र झगाधारी पाद्रीनेच काळ्या मनाने विश्वासघात केला तर?
 
 
 
आपल्या पापांच्या कबुली व प्रायश्चित्ताच्या बदल्यात त्याने लैंगिक सुखाची मागणी केली तर? ‘आपल्या चुका, पापांची जाहीर वाच्यता होऊ द्यायची नसेल तर मी जे सांगतो, ते तू केलेच पाहिजे,’ असे म्हणत त्याने ‘ब्लॅकमेल’ केले तर? होय, असाच प्रकार केरळमधील ‘मालंकरा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च’मध्ये सुरु असून आता त्याविरोधात ख्रिश्चन महिलांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण या प्रकरणात देशातील तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, बुद्धिजीवी, विचारवंत नि स्त्रीहक्कवाद्यांमध्ये चिडीचूप शांतता आहे, हे दुर्दैवी व लज्जास्पदच!
 
 
 
दरम्यान, केरळच्या ख्रिश्चन चर्चमधील महिलांच्या लैंगिक शोषणाचा हा काही पहिला किंवा एकमेव प्रकार नाही. केरळच्याच ‘सायरो मलबार चर्च’च्या बिशप फ्रॅन्को मुलक्कलने 2014 ते 2016 दरम्यान ननवर केलेल्या बलात्काराचे प्रकरण चांगलेच गाजले होते. सोबतच केरळच्या सिस्टर लूसी कलाप्पुरा या ननने ‘इन द नेम ऑफ द लॉर्ड’ नावाने आपले आत्मचरित्र लिहित ‘सायरो मलबार चर्च’मधील फ्रँको मुलक्कलसह अन्य पाद्री, बिशप्स वगैरेंनी केलेल्या भयानक लैंगिक अत्याचारांची पोलखोल केली. आता केरळच्याच पाच ख्रिश्चन महिलांनी सर्वोच्च न्यायालयात पोहोचत ‘मालंकरा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च’मधील अनिवार्य कन्फेशन परंपरेविरोधात व पाद्रींच्या लैंगिक शोषण, ‘ब्लॅकमेलिंग’विरोधात दाद मागितली.
 
 
 
 
इथल्या चर्च वा चर्चच्या अनुयायी व त्यातही महिलांसाठी ‘कन्फेशन’ची परंपरा अनिवार्य असून त्यालाच या महिलांनी आव्हान दिले. कारण, पाद्रीसारख्या तिर्‍हाईत व्यक्तीसमोरील पापाच्या कबुलीमुळे व्यक्तीच्या धर्म व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. धक्कादायक म्हणजे, संबंधित महिलांनी पापांची कबुली दिल्यानंतर ते जगासमोर उघड होऊ नये म्हणून पाद्री लैंगिक सुखाची मागणी करतात, तसेच ‘ब्लॅकमेल’ही करतात. याचिकाकर्त्यांनी या छळाचाही उल्लेख केला असून दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
 
 
 
मात्र, देशाच्या एका राज्यातील ख्रिश्चन धर्मातील चर्च व्यवस्थेत एकामागोमाग एक महिलांवरील लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या भयंकर घटना उघडकीस आल्या तरी त्यावर स्वतःला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, विचारवंत म्हणवून घेणार्‍यांनी कधीही जीभ चालवली नाही, ना लेखणी खरडली. दरम्यान, केरळच्याच शबरीमला मंदिरात मासिक पाळी आलेल्या महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात याच पुरोगामी-विचारवंत जमातीने थयथयाट केला होता. दोन वर्षांपूर्वीच्या त्या प्रसंगावेळी हिंदू धर्मातील महिलांवर बेफाट अन्याय-अत्याचार होतो, असे म्हणत पुरोगामी विचारवंती टोळ्यांची कावकाव सुरु होती. पण आज ‘मालंकरा ऑर्थोडॉक्सचर्च’मधील महिलांनी आपल्यावरील लैंगिक अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवला तर पुरोगामी विचारवंतांतला एकही माईचा लाल त्यांच्या समर्थनासाठी पुढे आला नाही.
 
 
 
अथवा ख्रिश्चन चर्च, तिथल्या पाद्री, बिशप वगैरे धर्मव्यवस्था-धर्मसत्तेला घंटा वाजवत जाब विचारण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. कठुआतील मंदिरातील कथित बलात्काराच्या घटनेनंतर पुरोगामी विचारवंती व माध्यमी कळपाने जो हलकल्लोळ माजवला, त्याच्या तसूभरही आरडाओरडा इथे करावासा त्यांना वाटले नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमांना ख्रिश्चन महिलांवरील चर्चमधल्या लैंगिक शोषणाविरोधात लेख-अग्रलेख लिहिण्याची बुद्धी झाली नाही, ना ‘प्राईम टाईम’ चर्चा करण्याची!
 
 
 
त्याचवेळी कोण्या अभिनेत्रीने नग्न फोटोशूट केले, तर त्याची कौतुककवने प्रसारमाध्यमांतून गायली गेली. अर्थात, कोणी कसे फोटोशूट करावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण दोन घटना एकाच वेळी घडत असताना त्यात निदान विचारवंत नि माध्यमांनी तरी शोषितांच्या बाजूने उभे राहावे, अशी अपेक्षा. पण ते झाले नाही, याला हिंदू-बिगरहिंदू व प्रामुख्याने महिला स्वातंत्र्य, हक्क, अधिकार रक्षणाच्या संदर्भानेही दांभिक, दुटप्पीपणाच म्हटले पाहिजे. म्हणजेच, संविधानिक व मानवी नीतिमूल्यांचे उल्लंघन करत चर्च-पाद्रींनी लैंगिक अत्याचार केले तर त्या महिलांना पाठिंबा देणारे कोणीच पुढे आले नाही, पण जिथे हिंदू महिलांनी कधी स्वतः मागणी केली नाही त्या शबरीमला मंदिरातील महिलाप्रवेशासाठी तथाकथित पुरोगामी, विचारवंतांनी आंदोलन चालवले, त्याचवेळी कोण्या महिलेने नग्नतेचे प्रदर्शन मांडले तर त्यामागेही अनेक जण उभे ठाकले! मात्र, यावरुन महिला सबलीकरणाच्या वाटचालीतला कोणता विषय महत्त्वाचा आणि प्राधान्याचा हे ओळखण्याचा विवेक या पुरोगामी विचारवंतांपैकी कोणाकडेच नाही, हेही स्पष्ट होते.
 
 
 
दरम्यान, चित्रपट आणि वेबसीरिजच्या दुनियेतही फार काही निराळा प्रकार होत नाही, जे विचारवंती टोळक्यात होते, तेच इथेही. आश्रमातील हिंदू साधू-संतांना कुकर्मी ठरवताना पाद्री व मौलानांच्या कुकृत्यांवर पद्धतशीरपणे पडदा टाकला जातो. पुरोगामी विचारवंत, धर्मनिरपेक्ष, साहित्यिक नि चित्रपटकर्त्यांच्या कंपूत ‘हवस का पुजारी’च असतो पण चर्च, मदरसे, मशिदींतील शेकडो लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येऊनही ‘हवस का पाद्री’ किंवा ‘हवस का मौलाना’ कधीच नसतो!
 
 
अशा परिस्थितीत चर्च वा मशिदींसारख्या बिगरहिंदू धर्मव्यवस्थेने तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, विचारवंतांना विकत घेतल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परिणामी कोणावर कितीही अन्याय-अत्याचार केला तरी रोज ताटात चाय-बिस्कुट टाकणार्‍या मालकांविरोधात पाळीव श्वानांच्या तोंडातून भुंकणे कसे ऐकू येईल? उलट ते महिला-बालकांवर मालकाने केलेल्या अन्याय-अत्याचारानंतरही शेपटी हलवत मागे-पुढेच फिरत राहतील. कारण, प्रश्न महिलांच्या न्यायाचा नव्हे तर स्वतःच्या ताटात पडणार्‍या तुकड्यांचा असतो ना!





@@AUTHORINFO_V1@@