'आरे'चे सरकारी निर्णय खड्ड्यात टाकणारे
मुंबई (प्रतिनिधी) - 'आरे'मधील 'मेट्रो-३'चे कारशेड हलवण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोधी पक्षेनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी या मुद्द्यावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. 'मेट्रो-३'चे कारशेड हलवण्याबाबत सरकारने घेतलेला निर्णय हा प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच आर्थिक पातळीवरही कसा चुकीचा आहे, यावर त्यांनी भाष्य केले.
गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमधील 'मेट्रो-३'चे कारशेड गोरेगावच्या पहाडी भागात हलविण्याचा प्रस्ताव राज्य सरकाराने मांडला आहे. मात्र, हा प्रस्ताव चुकीचा असून आर्थिक दृष्ट्या तो राज्य सरकारसाठी भूर्दंड असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. ते पावसाळी अधिवेशानात बोलत होते. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाबरोबरच हरित लवादाने 'मेट्रो-३'च्या कारशेडच्या जागेला परवानगी दिली आहे. सद्यस्थितीत या कारशेडमधील बांधकाम ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. या डेपोसाठी मरोळ-मरोशी येथे अंडरपास आणि सिप्झ मेट्रो स्थानकातून कारशेडमध्ये गाडी पोहोचण्यासाठी रॅम्प आणि भुयाराचे कामही पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रकल्प गोरेगाव पहाडी भागात हलवल्यास झालेल्या कामाचे पैसे कोण देणार ? असा सवाल फडणवीसांनी सरकारला विचारला.
मेट्रोचे काम बंद ठेवल्यामुळे दररोज चार ते साडे चार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे. 'आरे'च्या कारशेडबाबत सरकारने नेमलेल्या समितीने देखील कारशेड आहेच त्या जागी ठेवावे, अशी सूचना केली आहे. मात्र, आता गोरेगाव पहाडी येथे कारशेड हलवून ती खासगी जागा खरेदी करण्याचा खर्च सरकारच्या माथी पडणार असल्याचे, फडणवीस म्हणाले. या सगळ्याचा परिणाम मेट्रोच्या तिकिट दरांवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.