चित्रपटसृष्टीचा ‘जादूगार मामा...’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2020
Total Views |

ashok saraf_1  


केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन घडवणारे चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेते म्हणजेच ‘अभिनयसम्राट’ अशोकमामा सराफ...


लहानपणापासून मी या अभिनेत्याचा प्रचंड मोठा चाहता आहे. मीच काय, संपूर्ण महाराष्ट्रातले रसिक या अभिनेत्यावर मनापासून प्रेम करतात. या अभिनेत्याला सर्व जण प्रेमाने ‘मामा’ असे म्हणतात. मात्र, त्यांना ‘मामा’ हे नाव कसे पडले, यामागे एक रंजक कहाणी आहे. एका मुलाखतीत या अभिनेत्याचे ‘मामा’ म्हणून नामकरण कशा पद्धतीने झाले, त्याचा एक किस्सा खुद्द त्यांनीच सांगितला होता. ते म्हणाले होते, काही वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबरोबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अभिनेते अमुक अमुक... पण, तू त्यांना ‘मामा’ म्हणायचे आणि तेथूनच त्यांना सर्व जणांनी ‘मामा’ म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांतच सेटवर जो कोणी येईल, ते सर्व जण त्यांना ‘मामा’ म्हणूनच हाक मारू लागले. हळूहळू हेच नाव त्यांना चिकटले आणि ते संपूर्ण इंडस्ट्रीचे ‘मामा’ झाले! मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील ‘सुपरस्टार’ असणारे हे व्यक्तिमत्त्व गेल्या पाच दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांच्या विनोदी शैलीने त्यांनी आणि अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मिळून मराठी चित्रपटाला पडत्या काळात नवसंजीवनी दिली होती. ८०चे पूर्ण दशक आणि ९०च्या दशकातील काही वर्षे पडद्यावर फक्त या दोघांचेच राज्य होते. चित्रपट हिट करायचा फॉर्म्युला म्हणजे त्यात ही जोडी असणे हे समीकरण पक्के झाले होते. या अभिनेत्याचे चित्रपट पाहत गेली अनेक दशके अनेक कलाकार घडले आहेत, समृद्ध झाले आहेत. लहानपणापासून या अभिनेत्याचे चित्रपट टीव्हीवर, थिएटरमध्ये पाहताना हा नट एक ‘जादूगार’ आहे, असेच वाटते. विनोदी भूमिकेत त्यांना पाहताना दिलखुलास आपण हसत राहतो. गंभीर भूमिका पाहून आपण हळहळतो, त्यांनी साकारलेला खलनायक पाहून तिरस्कारही वाटू लागतो. जादूगार जसा त्याच्या पोतडीतून एक-एक वस्तू काढत समोरच्याला खिळवून ठेवतो, अगदी तसंच चित्रपटांमधील या अभिनेत्याची विविध रूपे, भूमिका प्रेक्षकांना भुरळ पाडतात. सहजसुंदर अभिनय, विनोदी प्रवृत्ती, चेहर्‍यावरील कमालीचे हावभाव व अचूक टायमिंग या सगळ्या गोष्टी असणारे सर्वगुणसंपन्न जादूगार अभिनेते म्हणजेच ‘अभिनयसम्राट’ अशोक सराफ.
मूळचे बेळगावचे असणारे अशोक सराफ यांचा जन्म ४ जून, १९४७या दिवशी दक्षिण मुंबईतील चिखलवाडीला झाला. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांचे वडील आयात-निर्यातीचा व्यवसाय करायचे. त्यांचीही त्यांच्या मुलाकडून सामान्य पालकांची असते तशीच अपेक्षा होती, चांगले शिकून चांगली नोकरी करावी. पण, या अतरंगी मुलाच्या मनात अभिनयात शिरण्याचे बेत शिजत होते, तरीही वडिलांच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. मग काय, त्यांनी मनाविरुद्ध बँकेतील नोकरी स्वीकारली, नुसती स्वीकारलीच नाही, तर नेटाने पुढील दहा वर्षे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये ते नोकरी करत राहिले. मुलाने चांगली नोकरी धरल्याचा त्यांना आनंद होता. पण, अशोक यांच्या मनात मात्र अभिनयाशिवाय दुसरा कोणता विचार यायचा नाही. याचमुळे नोकरीत असताना त्यांनी नाटकात काम करून स्वतःचं स्वप्न जीवंत ठेवलं. अभिनयात आपलं स्थान बळकट करत असताना, त्यांनी दहा वर्षे प्रामाणिकपणे नोकरीही केली. अध्ये-मध्ये आपली आवड जीवंत राहावी म्हणून नाटकात छोटे रोल करत राहिले. हा पण एक योगायोगच म्हणावा लागेल की, विनोदी भूमिकांमध्ये ज्यांना ‘ध्रुवपद’ मिळाले आहे, त्यांच्या अभिनयाची सुरुवातही एक विदूषकाच्या भूमिकेपासून झाली. प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या ‘ययाती’ या नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका केली. कदाचित हाच नियतीचा एक सिग्नल होता की, जो माणूस पुढे लोकांना हसवून लोटपोट करणार होता, त्याचा प्रवास विदूषकाची भूमिका करून सुरू होणार होता. त्यांच्या भूमिका बघून त्यांच्यातील प्रतिभा ओळखून, गजानन जहागीरदार यांच्यासारख्या मराठी सिनेमातील मोठ्या दिग्दर्शकाने त्यांना एक रोल दिला. रोल खूप लहान होता आणि पैसा पण खूप नव्हता. पण, यातून काहीतरी खास साध्य झालं. ते म्हणजे, मोठ्या पडद्यावर अशोक सराफ यांची उपस्थिती प्रेक्षकांना जाणवली होती. १९७१मध्ये आलेल्या या चित्रपटाचे नाव ‘दोन्ही घरचा पाहुणा’ होते.
चित्रपट प्रवासाला सुरुवात तर झाली. परंतु, चित्रपटातील यश बघायला चार वर्षे जाऊ द्यावी लागली. १९७५ला दादा कोंडकेच्या ‘पांडू हवालदार’ चित्रपटाद्वारे त्यांनी प्रथम यश काय असते ते अनुभवले आणि ते पण असे की, परत कधी या मार्गात अपयश आलेच नाही आणि वेग पण इतका होता की, त्या वेगात फक्त लक्ष्मीकांत बेर्डेच त्यांच्या बरोबर धावू शकले, बाकी कोणी आसपाससुद्धा आले नाही. अशोक सराफ यांच्या कॉमेडीला मराठी सिनेमा विश्वात एक खासच जागा मिळाली होती. त्यांनी अश्लील हावभाव आणि थोबाडीत मारून विनोद निर्मिती केलेल्या दृश्यांपेक्षा एक स्वच्छ आणि निखळ विनोद काय असतो, ते दाखवून दिलं. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत-जम्मत’, ‘धूमधडाका’ आणि ‘एक पेक्षा एक’ अशा चित्रपटांमधून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. अशोक सराफ यांची जोडी मराठी अभिनेत्री रंजनाबरोबर प्रेक्षकांना खूप आवडली. त्या दोघांची जोडी अगदी शाहरुख-काजोल किंवा अमिताभ-रेखा यांच्या जोड्यासारखीच मराठीमध्ये गाजली. त्या दोघांच्या सिनेमाला प्रचंड फॅन फॉलोईंग मिळत असत. विनोदी अभिनेत्याच्या रूपात एक ठसलेली ओळख असूनही, त्यांना रोमॅण्टिक हिरो म्हणून ओळख मिळवणे ही एक मोठी बाब होती. अशोक सराफ यांचे एक अतिशय गाजलेले रोमॅण्टिक गाणे ‘अश्विनी ये ना’ विशेष म्हणजे, हे गाणे ‘किशोरदा’ यांनी अशोक सराफ यांच्यासाठी गायले आहे. अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशीही त्यांची जोडी चांगलीच प्रसिद्ध झाली आणि नंतर दोघांनी लग्नदेखील केले. अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यात जवळपास १८वर्षांचं अंतर आहे. दोघांनी गोव्यातील मंगेशी देवस्थानात लग्न केलं होतं. अशोक सराफ यांची गणपती आणि शंकरावर विशेष आस्था आहे. तसेच ‘मंगेशू’ हे त्यांचं कुलदैवत आहे. याचमुळे त्यांनी मंगेशी देवळात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना एक मुलगा आहे, अनिकेत. त्याने अभिनयाऐवजी ‘शेफ’ म्हणून करिअरची निवड केली आहे.
अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून ‘नवरी मिळे नवर्‍याला’, ‘आत्मविश्वास’, ‘गंमत जम्मत’, ‘आयत्या घरात घरोबा’पासून अलीकडच्या ‘शुभमंगल सावधान’, ‘आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. हिंदी सिनेमाचे म्हणाल, तर हिंदी चित्रपटसृष्टीने अशोक सराफ यांची प्रतिभा योग्यरित्या वापरलीच नाही. त्यांना योग्य भूमिका देऊन योग्य न्याय केला नाही. तिथे त्यांना कायम लहान भूमिकेत ठेवले गेले, ते हिंदीत केवळ ‘कॉमिक रिलीफ’ म्हणून वापरले जात. त्यांनी मात्र कायम मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यांच्या विशिष्ट शैलीने ते कायम प्रेक्षकांना लक्षात राहिले. मग तो रोल ‘करण अर्जुन’ मधील मुन्शी असो की, ‘येस बॉस‘ मधील शाहरूखचा मित्र, ‘सिंघम’मधील हेड कॉन्स्टेबल आणि ‘जोरू का गुलाम’मधील गोविंदाचा मामा. नुकत्याच आलेल्या ‘शेंटीमेंटल’ या मराठी सिनेमात त्यांनी पुन्हा खाकी वर्दी घातली होती. तसेच ‘प्रवास’ व ‘मी शिवाजी पार्क’मधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
अशोक सराफ यांची प्रतिभा लहान पडद्यावर पण छाप पाडून गेली. ‘हम पांच’ या मालिकेतील ‘आनंद माथूर’ कोण विसरू शकेल का? किंवा, सहारा टीव्हीवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या मालिकेची अशोकमामांची पत्नी निवेदिता यांनीच निर्मिती केली होती. अमेरिकेतील सिएटल येथे झालेल्या ‘बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन’ येथे विजय केंकरे दिग्दर्शित ‘हे राम कार्डिओग्राम’ या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले. अशोक सराफ दोनदा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले होते. पहिला अपघात हा १९८८मध्ये झाला होता. त्यावेळी त्यांच्या मानेला मोठा झटका बसला होता. त्यासाठी त्यांना सहा महिने विश्रांती घ्यावी लागली होती. यातून बरे झाल्यानंतर त्यांनी ‘मामला पोरीचा’ या चित्रपटातून कमबॅक केले होते, तर दुसरा अपघात हा २०१२मध्ये झाला होता. यावेळी देखील एका मोठ्या अपघातातून ते बालबाल बचावले होते. मुंबई-पुणे महामार्गावर तळेगावचा बोगदा क्रॉस करत असताना त्यांच्या गाडीचा पाठीमागील टायर फुटला होता. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. एका मोठ्या अपघातातून त्यांची सुटका झाली. त्या गाडीमध्ये अशोक सराफ यांच्यासह अभिनेता संतोष जुवेकर, दिग्दर्शक असित रेडीज व संगीतकार सतीश चंद्र होते.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्रमंडळीतच मिसळणारा आहे. अभिनेते नाना पाटेकर व अशोक सराफ यांची मैत्री आधीपासून घट्ट आहे. अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्तानाला परिचित आहेत. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्यासोबत त्यांनी मराठी विनोदी चित्रपटांची मालिकाच केली. त्यांनी आपले कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून आपली वेगळी शैली निर्माण केली. 80च्या दशकात त्यांनी असंख्य चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षक वर्गास पोटभरून हसवले. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारे अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणीवर कामाचा व्याप आजही न थकता सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाचे विविध पुरस्कार मिळविले आहेत. सुमारे पाच दशकांपूर्वी अशोक सराफ यांची चालू झालेली ही हास्ययात्रा अजूनही सुरू आहे. त्यांना स्क्रीनवर पाहताना, आपल्या चेहर्‍यावर एक मोठ्ठं हसू येण्याची खात्रीच असते! अशा विनोदी दिग्गज कलावंताला मानाचा मुजरा...


- आशिष निनगुरकर
@@AUTHORINFO_V1@@