तंबूमध्ये करिअर शोधणारा वाटाड्या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2020   
Total Views |

ushant kambale_1 &nb

गिर्यारोहणात रस असणार्‍या सुशांत कांबळे यांनी ‘टेन्ट कॅम्पिंग’ ही नवी संकल्पना महाराष्ट्रात रुजवण्याचा फक्त प्रयत्नच केला नाही तर त्यात ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’तर्फे किताबही मिळवला. त्यांची गोष्ट...

महाराष्ट्राला लाभलेल्या ऐतिहासिक आणि परंपरेच्या वारशाची जपणूक व्हावी व तो वसा पुढील पिढीकडे सुपूर्द करावा, असा प्रयत्न आजवर अनेकांनी केला. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले असो वा आपली देवस्थाने वा इतर ऐतिहासिक वारसा असो, हा वैभवसंपन्न इतिहास जपला पाहिजे. कारण, पर्यटनाच्या आणि परंपरेच्या अशा दोन्ही दृष्टीने हा वारसा महत्त्वाचा ठरतो. आपल्या वयाच्या तिसर्‍या वर्षांमध्ये वडील तुकाराम कांबळे यांच्यासह मुरूड-जंजिर्‍यावर जाणार्‍या सुशांतच्या मनावर हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास तेव्हापासूनच रुजला असावा.

शाळा-महाविद्यालयात असताना गड-किल्ले, महाराष्ट्रातील अन्य ऐतिहासिक व निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या ठिकाणी रमण्याची त्याला आवड होती. पुढे जाऊन याच आवडीचे करिअरमध्ये रुपांतर करण्याची कल्पना सुशांतने सत्यात साकारली. उत्तर आणि पूर्व भारतात प्रसिद्ध असणार्‍या ’टेन्ट कॅम्पिंग’ला व्यावसायिकरुप देऊन सादर करण्याचा विचार त्याच्या मनात आला. यापूर्वी बर्‍याच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि समूहांसोबत त्याने ‘टेन्ट कॅम्पिंग’ केले होते. परंतु, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांना एकत्र आणण्यासाठी अशा प्रकारच्या मंचाचा पहिल्यांदाच वापर करण्याची कल्पना सुशांतना सुचली. कॉर्पोरेटच्या बड्या हॉटेल्स आणि एसी रुम्समध्ये होणार्‍या कॉन्फरन्स ‘टेन्ट कॅम्पिंग’च्या माध्यमातून करण्याची कल्पना त्यांनी लोणावळ्यातील ‘वेट अ‍ॅण्ड जॉय वॉटरपार्क’ आणि ‘मॅजिक माऊंटन अ‍ॅम्युझमेट पार्क’ यांच्यासमोर ठेवली. त्यांच्यातर्फे हिरवा झेंडा मिळाल्यावर यासाठी लागणार्‍या सर्व बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी सुशांत यांच्यावर येऊन पडली. ‘रोटट्रॅक क्लब डिस्ट्रीक्ट ३१४२’ या संस्थेतील २८० जणांच्या गटाची व्यवस्था सुशांत यांना पाहायची होती. पाहुण्यांच्या स्वागतापासून ते त्यांच्या राहण्याच्या आणि कार्यक्रमाच्या व्यवस्थेपर्यंत सर्वकाही पाहायचं. कार्यक्रमासाठी मंच उभा राहिला, तंबू उभे राहिले, पाहुण्यांच्या जेवणा-राहण्याची सोयही उत्तम झाली. दरम्यान, सुशांतने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’कडे या कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी अर्ज केला.


सुशांत यांच्या कार्यक्रमाची सर्व व्यवस्था आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दोन महिन्यांनी सर्व पडताळणी झाल्यावर हा किताब त्यांच्या नावे झाला. विशेष म्हणजे, इंडिया बुकमध्ये अशा प्रकारचा कुठलाही रेकॉर्ड यापूर्वी नोंदवण्यात आला नव्हता. राज्यातील विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर असे कित्येक यशस्वी ‘टेन्ट कॅम्पिंग’ सुशांत यांनी केले आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील ७०-८० गड-किल्ल्यांवर स्वतः गिर्यारोहण केले आहे. १२ नोव्हेंबर १९९३ रोजी मुंबईत कांदिवली येथे जन्मलेल्या सुशांत यांना बालपणापासूनच निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची आवड होती. शालेय शिक्षण धनामल हायस्कूलमध्ये झाले पुढील दोन वर्षे ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’ आणि त्यानंतर डहाणूकर महाविद्यालयातून ‘बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडिज’चे शिक्षण पूर्ण केले. एचआर आदित्य महाविद्यालय बोरिवली येथून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्यांचा कायम सक्रिय सहभाग होता. ‘टेन्ट कॅम्पिंग’ची सुरुवात राज्यात २००५-०६ पासून झाली होती. परंतु, म्हणावा तितका प्रसार झालेला नाही. मौजमजेसाठी तंबू ठोकून राहणे, गाणी गप्पा आणि शेकोटी इथवरच मर्यादित राहिला.


सुशांत यांनी या प्रकाराला व्यावसायिक स्वरुप दिले. २०१६-१७ पासूनच या प्रकारच्या उपक्रमांना त्यांनी सुरुवात केली होती. आशियातील एकमेव लोणावळ्यातील ‘वेट अ‍ॅण्ड जॉय वॉटरपार्क’मध्ये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी सुरू केली. तंबूत राहणे असले तरीही येणार्‍या प्रत्येकाची सुरक्षा आणि व्यवस्था चोख ठेवण्याचे ध्येय सुरुवातपासून ठेवल्याने लोकप्रियताही मिळत गेली. २० जणांमागे एक सुरक्षा रक्षक, प्रत्येक ५० जणांमध्ये एक प्रथमोपचार पेटी, दोन स्वतंत्र वाहने, सुरक्षा व्यवस्था या गोष्टींची काळजी सुरुवातीपासूनच घेतली. शौचालय उभारणीपासून ते वन्यजीवांपासून संरक्षणासाठीची व्यवस्था इत्यादी. तंबूमध्ये राहणे, खुल्या आभाळाखाली रात्री शेकोटीसमोर बसणे हे अनेकांचे स्वप्न सुशांत यांनी साकार केले होते. हळूहळू याला व्यावसायिक रुप देण्याचा विचार त्यांनी केला.
२५ आणि २६ जानेवारी, २०२० रोजी ‘रोटट्रॅक क्लब’च्या २८० जणांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सुशांत यांच्यावर आली. सफाळे समुद्र किनार्‍यावर असलेल्या एका खासगी जागेत त्यांनी या लोकांसाठी तंबू उभारण्याची तयारी केली. कार्यक्रमासाठी व्यासपीठही उभे राहिले. पाठीमागे लावलेले दोन एलईडी स्क्रीनमुळे कार्यक्रमही भव्यदिव्य वाटत होता. एका तंबू उभारण्याच्या कॅम्पची कल्पना एवढी विस्तारेल, असा विचार काही वर्षापूर्वी सुशांत यांनी काही वर्षापूर्वी केला नव्हता. या सर्व प्रवासात ‘मालपाणी ग्रुप्स’ने मार्गदर्शक म्हणून कायम भूमिका निभावली. भाऊ ओमकार आणि आई-वडिलांचाही त्यांना पाठिंबा मिळाला. पवना, तळेगाव, भंडारदरा, सांधण व्हॅली, कास पठार आदी ठिकाणी यशस्वीरित्या ‘टेन्ट कॅम्पिंग’ त्यांनी केले आहे. इथे जेवण वाढण्याचीही पद्धत फार वेगळी केली आहे. जेवणाची ताटेही स्टील किंवा धातूंची न ठेवता लाकडापासून बनवलेली, नारळाच्या करवंटीमध्ये मिळणारी कुरकुरीत खमंग भजी, जेवणही तितकेच रुचकर, असा वेगळा थाट तंबूतील जेवणाचा असतो. भविष्यात एक अ‍ॅकॅडमी निर्माण तरुणांना प्रशिक्षण देण्याचाही त्यांचा मानस आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@