डाव्यांनी केलेली पुस्तकहत्या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2020
Total Views |

delhi riots_1  


खुद्द ताहिर हुसैन याने हिंदूंना धडा शिकवण्यासाठी दिल्लीतील दंगल घडवल्याची कबुली दिली. डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवी कळपाला मात्र त्यावरच पांघरुण घालायचे असून इस्लामी धर्मांधांनी केलेल्या दंगलीचे वास्तव समोर येऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी Delhi Riots 2020 : The Untold Story पुस्तकाला विरोध केला.


डाव्या उदारमतवादी- बुद्धिजीवींचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य फक्त स्वतःच्या टोळक्यापुरते मर्यादित असते आणि त्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा टोळक्याबाहेरच्या व्यक्ती वा गटाने वापर करायचा ठरवले की, ही मंडळी गळा घोटण्यासाठी सरसावतात. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रखवालदार काय ते आम्हीच, असे म्हणत देशभर धुडगूस घालणार्‍या अशाच डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवींचा भेसुर चेहरा नुकताच समोर आला. गेल्यावर्षी भारतीय संसदेने नागरिकत्व सुधारणा-सीएए कायदा मंजूर केला आणि दिल्लीतील शाहीनबागेत मुस्लीम महिलांनी विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली. धर्मांध इस्लामी-कट्टरपंथीय व्यक्ती, संस्था व संघटनांच्या पाठिंब्याने चाललेल्या या आंदोलनात अनेक हिंदू व देशविरोधी कारवाया झाल्या. इथल्या भाषणबाजीमुळे दिल्लीसह त्याच्या ध्वनिचित्रफिती जिथे जिथे पोहोचल्या तिथे तिथे हिंदू व देशविरोधी विषाची बीजे रोवली गेली.


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शाहीन बागेतील मुस्लीम महिलांच्या निदर्शनांना चुकीचे ठरवले व त्यांना तिथून हटवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तथापि, ते काही झाले नाही व शाहीनबागेतील मुस्लीम महिलांचा विरोधाचा सिलसिला सुरुच राहिला. नंतर याच शाहीनबागेतील विघातक कृत्यांचा परिणाम म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीवेळीच राजधानी दिल्लीत दंगल घडवली गेली. दिल्ली दंगलीचे हेच हिंदू व देशविरोधी भीषण वास्तव मांडणारे Delhi Riots 2020 : The Untold Story हे पुस्तक अ‍ॅड. मोनिका अरोरा, सोनाली चितळकर आणि प्रेरणा मल्होत्रा यांनी लिहिले. शनिवार, दि. २२ऑगस्ट रोजी भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या हस्ते सदर पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला. मात्र, त्याआधीच ‘ब्लूम्सबरी इंडिया’ प्रकाशनगृहाने नैतिक जबाबदारीचा उल्लेख करत दिल्ली दंगलीचे सत्य कथन करणारे हे पुस्तक छापण्यास नकार दिला. कारण, देशातील डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवी आणि कट्टर इस्लामींचा दबाव!


उल्लेखनीय म्हणजे, ‘ब्लुम्सबरी इंडिया’ने सुरुवातीला सदर पुस्तक छापण्याची तयारी केली होती व अ‍ॅमेझॉनवर त्याची प्रकाशनपूर्व नोंदणीही सुरु झाली होती. परंतु, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या तथाकथित लढवय्यांनी हे पुस्तक न वाचताच समाजमाध्यमांवर #ShameOnBloomsbury असा हॅशटॅग चालवत त्याविरोधात आघाडी उघडली. डाव्या कंपूतील खोटारडा इतिहासकार विल्यम डेलरिम्पन, आतीश तासीर, मीना कांदासामी, साकेत गोखले, पत्रकार आरफा खानम शेरवानी, कविता कृष्णन, अभिनेत्री स्वरा भास्कर आदींनी यात उत्साहाने पुढाकार घेतला. दिल्ली दंगलीत आम आदमी पक्षाचा नगरसेवक ताहिर हुसैन याने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ व उमर खालिदसारख्या कट्टरपंथीयांशी हातमिळवणी करुन राजधानी जाळल्याचे कोणाहीपासून लपून राहिलेले नाही. खुद्द ताहिर हुसैन यानेदेखील हिंदूंना धडा शिकवण्यासाठी आपण दंगल घडवल्याची कबुली दिली. डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवी कळपाला मात्र त्यावरच पांघरुण घालायचे असून इस्लामी धर्मांधांनी केलेल्या दंगलीचे वास्तव समोर येऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी Delhi Riots 2020 : The Untold Story पुस्तकाला विरोध केला आणि अखेर अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणार्‍या झुंडीच्या हातातली कठपुतळी होत ‘ब्लुम्सबरी’ने हे पुस्तक छापणार नाही, असे सांगितले.


मात्र, ‘ब्लुम्सबरी’ने जो निर्णय घेतला, त्याआधी Shaheen Bagh : From a Protest to a Movement हे ताहिर हुसैनला निर्दोष ठरवणारे पुस्तक छापून प्रकाशितही केले होते. शाहीनबागेतील मुस्लीम महिलांचे विरोध प्रदर्शन म्हणजे काही उत्तम आदर्शाचा नमुना नव्हे. उलट देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍या या विरोधामुळे दिल्लीतील लाखो सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला व त्याची परिणती रक्तरंजित दंगलीत झाली, आयबी अधिकारी अंकित शर्मासह 50 पेक्षा अधिक लोक यात मारले गेले. मात्र, त्याच शाहीन बागेतील निदर्शनांचे व ताहिर हुसैनचे महिमामंडन करणारे पुस्तक ब्लुम्सबरीने मोठ्या अभिमानाने प्रकाशित केले. तेव्हा या प्रकाशनगृहाची नैतिक जबाबदारी कुठल्या उकीरड्यावर लोळत होती?


दरम्यान, देशातील डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवींनी आपले मेंदू इस्लामी धर्मांधांकडे गहाण ठेवलेले आहेत. त्याच्या जोरावर त्यांना त्यातून नक्कीच काहीतरी अर्थपूर्ण लाभ होत असतील आणि म्हणूनच धर्मांध इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचे झाकलेले सत्य बाहेर यायला लागले की, डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवींच्या टोळ्या सक्रिय होतात. आपण आतापर्यंत जे असत्य जनतेला सांगत आलो, त्याच्या चिंधड्या उडतील नि आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील, अशी भीती त्यांना वाटते. अ‍ॅड. मोनिका अरोरा, सोनाली चितळकर आणि प्रेरणा मल्होत्रा यांनी लिहिलेल्या Delhi Riots 2020 : The Untold Story या पुस्तकाचे प्रकाशन होऊ न देण्यातून हेच सिद्ध झाले. तसेच भारतीय वाचकांनी काय वाचायचे आणि लेखकांनी काय लिहायचे, प्रकाशनगृहाने काय छापायचे आणि काय छापायचे नाही, हे आम्हीच ठरवणार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य केवळ आमच्याच विचारधारेला तुम्हाला नाही, हे सांगणारी छद्म उदारमतवादी डाव्या बुद्धिजीवींची हुकूमशाही प्रवृत्तीही इथे दिसून आली. इतकेच नव्हे तर इतरांना असहिष्णु आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हत्यारे म्हणणार्‍यांचेच हात एका पुस्तकाच्या खुनात रक्ताळलेले असल्याचेही स्पष्ट झाले.


‘ब्लुम्सबरी’ने Delhi Riots 2020 : The Untold Story पुस्तकाचे प्रकाशन रद्द केल्यानंतर डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवींच्या टोळक्याने समाजमाध्यमांवर फार मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात आनंदही साजरा केला. मात्र, सत्यावर आपण विजय मिळवल्याचे असत्याला नेहमीच वाटत असते व ते टाळ्या पिटून तसे सांगतेही. पण असे कधीही होत नाही आणि डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवींसारख्या भुरट्यांमुळे तर सत्य कधीच मरत नसते. आज एका पुस्तकाला घाबरलेल्या डाव्यांनी आणि ते समोर येऊ नये म्हणून त्यावर कुत्र्यासारखे झुंडीने तुटून पडलेल्यांनी दिल्ली दंगलीचे वास्तव अजिबात लपून राहणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे. उलट ‘सत्यमेव जयते’ ब्रीद असलेल्या देशात दिल्ली दंगलीचे सत्य फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेईल आणि त्यावेळी मात्र डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवी झुंडीचा बुरखा टराटरा फाटेल, हे नक्की.
@@AUTHORINFO_V1@@