मुंबई : कोरोनाच्या संकटात देशासाठी वीस लाख करोडच्या पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याविषयी कोणत्याही अभ्यास न करता, माहितीशिवाय कोरोनाचे संकट असताना राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी आंदोलन करण्याचा एक बालबोध प्रयत्न युवक काँग्रेसने केला, असा आरोप भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे. तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे अज्ञान दूर करण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चा करेल असेही विक्रांत पाटील म्हणाले.तसेच वीस लाख करोड विविध योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारतासाठी खर्च केले जाणार आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी 'आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत' या पुस्तकातून केली आहे. या पुस्तकाच्या प्रति भाजयुमोतर्फे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देण्यात येणार होत्या पण भाजयुमोचे कार्यकर्ते आपल्याला उत्तर देण्यास तयार असल्याचे बघत आपला नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न फसतो आहे असे लक्षात येताच युवक काँग्रेसचे कोणीही भाजपा कार्यालयाकडे फिरकले सुद्धा नाही. त्यामुळे हा केवळ राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसकडून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे असेही विक्रांत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रभर सर्वसामान्य, भोळ्याभाबड़या लोकांना , वीस लाख करोड पैकी किती पैसे मिळाले? कहा गए बीस लाख करोड? असे महणत दिशाभूल करण्याचे कार्यक्रम युवक काँग्रेसच्या वतीने सुरु आहेत. कदाचित त्यांच्या पक्षातून झालेल्या संस्कारातून त्यांना 'पैसे मिळाले का?' , 'पैसे आले का ?',असेच प्रश्न विचारण्याची सवय असावी, असंही पाटील म्हणाले. पुढे त्यांनी माहिती दिली की, कॉग्रेसचेच कार्यकर्ते कॉग्रेसच्या कार्यकर्त्याना असे प्रश्न विचारतात आणि त्यावर दिशाभूल करणारी उत्तरे देत व्हिडिओ शूट करुन सोशल मिडीयावर टाकत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाने यांची पोलखोल यापूर्वीच केली आहे.