मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत पवारांनी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं.तसेच राग नेमका कसला राममंदिर भूमिपूजनाचे समर्थन कि सुशांतसिंगच्या आत्महत्येचा सीबीआय तपासाची मागणी', असं भाजपाचे नेते निलेश राणे यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. "स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून?" असा सवाल देखील निलेश राणे यांनी पवारांना केला आहे. तर आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवार यांचे कौतुक केले आहे. 'आज परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा है... थांबू नकोस मित्रा!' असे ट्विट नितेश यांनी केले आहे. पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तर, जय श्रीराम म्हणत राम मंदिराच्या भूमिपूजनाचे उघडपणे समर्थन केले होते.
शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही", असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांना ५० वर्षे ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यासोबत, पार्थ यांनीच याबाबतची मागणी केल्याचं सांगताच, पार्थच्या मताला किंमत नसल्याचे पवार म्हणाले. तो इन्मॅच्युअर आहे, असेही त्यांनी म्हटले.