स्वातंत्र्यसूक्तांचे उद्गाते - लोकमान्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
Lokmany 1_1  H



अथांग पसरलेल्या किनार्‍याला टकरा देत उचंबळणार्‍या लाटा तुम्ही पाहिल्या असतील. अनेकदा बेभान होऊन त्या भिडतात किनार्‍यावर, कारण विराट समुद्र असतो त्या लाटांच्या पाठीशी! ब्रिटिशांच्या साम्राज्याशी टिळकसुद्धा एखाद्या लाटेप्रमाणे टकरा देऊ पाहात होते, पण त्यांच्या पाठीशी विराट सागर होता कुठे? टिळकांचे मोठेपण हे आहे की, त्यांनी एकीकडे ब्रिटिशांशी तर झुंजी दिल्याच ; पण दुसरीकडे आपल्या मागे खंबीरपणे चालणारी शेकडो माणसे निर्माण केली. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर विराट लोकसागर उभारला. ब्रिटिश साम्राज्यावर धडका देत देत ही ‘लोकमान्य’ लाट फेसाळत, उचंबळत गर्जना करत होती, ‘स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य!’


‘पदवी मिळाली तरीही इंग्रजांची चाकरी करणार नाही,’ या प्रतिज्ञेने दोन जिवलगांनी घेतला होता शिक्षणाचा वसा! या जिद्दीवर टिळकांनी संस्था तर बांधल्याच, पण त्याहून तळमळीने संस्थेच्या उद्धारासाठी झटणारी माणसं उभी केली. इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वरी वरदान ही जाणीव सुखवस्तू समाजात असताना टिळक राजकारणात पडले. ‘स्वराज्य’ हा शब्द काढायचाय कशाला? आहे ते बरे आहे की, असे मानणारा संतुष्ट समाज टिळकांना जागा करावा लागला. केवळ ‘केसरी’चा अग्रलेख लिहून आपले भागणार नाही, याची जाणीव ‘केसरी’ काढण्यापूर्वीचं त्यांच्या मनात जागी होती. दुष्काळाच्या काळात त्यांनी आपले कार्यकर्ते गावोगावी पाठवून लोकजागर केला होता. गायीच्या कासेतले गोचीड ज्याप्रमाणे तिचे रक्त पिते, तसे हे इंग्रज आपले आर्थिक शोषण करत आहेत, हे त्यांना लोकांच्या कानीकपाळी ओरडून सांगावे लागले. ‘तुमचे धंदे उद्ध्वस्त करून सगळा पैसा गोर्‍यांच्या देशात चालला,’ हे टिळकांनी व्यापार्‍यांना सप्रमाण दाखवून दिले. परिणामी, व्यापारी अस्वस्थ झाले. कामगारांच्या कष्टावर देशाचा गाडा चालला आहे, पण त्यातून कामगारांना मिळत मात्र काहीच नाही. त्यामुळे ‘तुमच्या राज्यात तुम्हाला हवे ते हक्क मिळतील, त्यासाठी तरी लढा!’ म्हणत टिळकांनी सिंहनाद केला. ‘बाबांनो, स्वराज्य हा तुम्हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे,’ हे टिळकांना लोकांच्या कानीकपाळी ओरडून सांगावे लागले. इतक्या वेगवेगळ्या माध्यमातून, सर्व स्तरांतून टिळकांनी तो असंतोष बाहेर काढला. चिरोलने ‘असंतोषाचे जनक’ म्हणून टिळकांना मारलेला टोमणा हा सर्वार्थाने बहुआयामी आहे तो असा!


गोष्टीतला तो हत्ती जसा त्या आंधळ्यांपैकी प्रत्येकाला वेगवेगळा वाटला, तसेच टिळकही. बंगाली बंधूंचे ते ‘बडे दादा’ असत, क्रांतीकारकांना ते आपले पाठीराखे वाटत, कुणी त्यांना ‘टिळक महाराज’ म्हणून बोलवत, लोक त्यांना ‘लोकमान्य’ म्हणत. युरोपात तर ‘भारतीय विद्वान’ म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला. तेल्यातांबोळ्यांना ‘टिळक’ हा आपला माणूस वाटे! सनातन्यांना बळवंतराव म्हणजे पक्के धर्माभिमानी भासत. आगरकरांना तर टिळक हे पक्के सुधारक आहेत, याची खात्री होतीच. सावरकर म्हणत, “टिळक इंग्रजांशी कधीच राजनिष्ठ नव्हते, टिळक साडीव राजद्रोहीच होते.” यातच त्यांचे ‘टिळकपण’ आहे. गांधींना टिळक दिसले होते समुद्रासारखे! तळाचा थांग सहजासहजी लागणार नाही असे! अष्टपैलू हा शब्द थिटा पडावा, असे होते बळवंतराव!


थकले म्हणून टिळक कधी थांबले नाहीत, त्यांच्या विश्रांतीसाठी एकच जागा ती म्हणजे तुरुंग! ‘केसरी’चा अग्रलेख लिहिताना यमदूत जरी दाराशी येऊन थांबला तरी ‘लेख पूर्ण होईस्तोवर तुझ्यासोबत येत नाही,’ असे ठणकावून सांगण्याची धमक होती टिळकांमध्ये! अखेरच्या दिवसांमध्ये तापाने फणफणलेले असताना, ‘काँग्रेसच्या परिषदांची पत्रे झाली का पाठवून?’ म्हणत मध्येच हा लढवय्या जागा होई. मृत्युशय्येवर पडण्यापूर्वी काही काळ अगोदर ‘स्वातंत्र्य मिळवण्याशिवाय हिंदुस्तानला तरणोपाय नाही!’ अशी वाक्य आहेत टिळकांची! काय अफाट ऊर्जा असेल या माणसाच्या अंगी!


शेतकर्‍यांपासून शाहिरांपर्यंत आणि कामगारांपासून कलावंतांपर्यंत प्रत्येक क्षेत्रातले लोक टिळकांचे अनुयायी होते. शाहिरांचे डफ, कवींची नवनवोन्मेशशालिनी प्रतिभा, नाटककारांच्या लेखणी, कामगारांच्या गिरण्या, शेतकर्‍यांची पिके, तरुणांचे बाहू, म्हातार्‍यांची मने एकाच शब्दाने एका शब्दाने पेटून उठल्या तो होता लोकमान्यांचा! टिळकांनी भारतीय राजकारणाचा एक काळ गाजवला. आजपासून बरोबर १०० वर्षांपूर्वीपर्यंत पहिल्या अखिल भारतीय नेत्याचा अस्त झाला. दरम्यान, त्यांचा स्मृतिजागर करण्यासाठी अगणित संस्था निर्माण झाल्या, स्मृतिस्थळे उभारली गेली, राजकीय नेतृत्वात स्थित्यंतर होणे स्वाभाविक होते, तसे झालेही. पुढे स्वातंत्र्य मिळवले आणि आज स्वातंत्र्याच्या सत्तरीत आपण लोकमान्यांची स्मृतिशताब्दी साजरी करतो आहोत.


टिळक एकदा म्हणाले होते, “देशाने स्वराज्य मिळवले तरी माझा लढा मात्र थांबणार नाही. देशाची शासनव्यवस्था निर्दोष होईस्तोवर तो लढा सुरूच राहणार!” म्हणूनच टिळकांच्या विचारांचा आठव आजही करावा लागतो, उद्याच्या ‘आत्मनिर्भर भारता’ची काळजी करायला सव्वाशे वर्षांपूर्वीच टिळकांनी सुरुवात केली होती, आपल्याला आता कुठे त्याचे महत्त्व थोडेसे उमगू लागले आहे.

या विशेषांकातील लेखकांच्या यादीत उद्याच्या भारताचे स्वप्न पाहणारे तरुण अभ्यासक दिसतील. अशा अभ्यासू तरुणांकडून, टिळक लिहिते करून घेण्याचा विचार संपादक किरण शेलार यांना सुचला ही कितीतरी अभिनंदनाची बाब! ‘भिऊ नकोस’ म्हणत ते सातत्याने या टीमच्या पाठीशी उभे राहिले. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच! मुख्य उपसंपादक (फीचर्स) विजय कुलकर्णी यांच्या सहकार्याशिवाय आणि सहभागाशिवाय या अंकाला पूर्णत्व आलेच नसते, हेही मी नम्रपणे नमूद करतो. लोकमान्यांचे चरित्र आणि टिळक विचारांचा मागोवा घेणारा हा विशेषांक त्यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त सानंद सादर करत आहोत...



- पार्थ बावस्कर, अतिथी संपादक, युगपुरुष लोकमान्य विशेषांक
@@AUTHORINFO_V1@@