मोती पिकवणारी मयुरी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020   
Total Views |
Mayuri_1  H x W




शेतकरी म्हटले की डोळ्यासमोर येतात ती अन्नधान्याची शेतं... मात्र, शेतीच्या या व्याख्येला छेद देत बुलढाण्याच्या मयुरी खैरे-आंबटकरने अनोखी ‘मोत्यांची शेती’ पिकवायला सुरु केली आहे.


मयुरी खैरे ही बुलढाण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुलगी. मोठे झाल्यावर वायुदलात भरती होऊन देशसेवा करायची हे तिचं स्वप्न! अभ्यासात हुशार असलेल्या मयुरीने या दृष्टीने प्रयत्नही सुरु केले होते. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. देशसेवा करू इच्छिणार्‍या मयुरीला तिच्या आजारपणामुळे आपल्या ध्येयापासून माघार घ्यावी लागली. परंतु, हार न मानता तिने काहीतरी अनोखं करून दाखवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि ते पूर्णदेखील केलं. ‘मोत्यांची शेती’ ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात राबवत ती आज एक यशस्वी उद्योजिका बनली आहे. मात्र, ही यशस्वी उद्योजिका काही वर्षांपूर्वी आजारापणामुळे इतकी खंगून गेली होती की, तिने आत्महत्येचा प्रयत्नदेखील केला होता. या सगळ्या निराशांवर मात करत इथवरचा तिचा प्रवास फार रोचक आहे.


मयुरीचे वडील बँकेत नोकरीला होते, तर आई आरोग्य खात्यात कामाला होती. त्यामुळे मयुरीचे प्राथमिक शिक्षण बुलढाण्यातच पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ती औरंगाबादमध्ये दाखल झाली. मुळातच अभ्यासू असलेली मयुरी बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्याचबरोबर वायुदलात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिली पायरी म्हणजेच प्रवेश परीक्षा आणि त्या परीक्षेतही मयुरी उत्तीर्ण झाली. मात्र, शारीरिक चाचणीदरम्यान तिला किडनीच्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदान झाल्याने तिचे हे स्वप्न अधुरेच राहिले. पुढे ती आणखी आजारी पडली. अगदी दोन-चार पावले चालण्यासाठीही तिला इतरांच्या आधाराची गरज भासू लागली. तिच्या आजाराचं नेमकं निदान होत नव्हतं. नानाविध औषधे खाऊनदेखील तब्येतीत सुधारणा होतच नव्हती. या सगळ्यामुळे आलेल्या नैराश्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिच्या कुटुंबामुळे ती यातून सावरली आणि तिने पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केली. दरम्यान, तिने स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि ती घरून अभ्यास करू लागली.


आजारपणात तिने विरंगुळा म्हणून पुस्तकांशी दोस्ती केली. या वाचनाच्या छंदामुळे मयुरी नैराश्यातून बाहेर पडली. या छंदातून तिला भेटल्या सिंधुताई सपकाळ. स्वत: बेघर असताना इतरांना छत मिळावे याची चिंता करणार्‍या सिंधुताईंची कहाणी मयुरीला भावली. पुढे वाचनातून समोर आले प्रकाश आमटे, त्यांच्याकडून प्रेरणा घेत तिने नव्या उमेदीने पुढे जायचे ठरवले. या सगळ्यांपासून प्रेरणा घेत तिने आणि तिच्या काही मित्रमंडळींनी मिळून ‘ऊर्मी’ नावाच्या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत तिने शिक्षण क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. या दरम्यान तिला मोत्यांच्या शेतीविषयी काही माहिती मिळाली. ही संकल्पना तिला प्रचंड आवडली. कुठल्याही प्रकारच्या शेतीचा अनुभव नसलेल्या मयुरीने मग मोत्यांची शेती करायचे ठरवले. तिने आई-वडिलांना याबाबत कल्पना दिली आणि ते ही खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले.


मोत्यांची शेती करण्याचे प्रशिक्षण भुवनेश्वर येथील एका संस्थेत दिले जात असल्याची माहिती मयुरीला मिळाली. मयुरी आणि तिचे बाबा भुवनेश्वरला पोहोचले. मात्र, मयुरीचे कमी वय आणि मर्यादित जागा यांमुळे त्या संस्थेत तिला प्रवेश नाकारण्यात आला. परंतु, तिथे तिला हरी यादव नावाची मोत्यांची शेती करणारी व्यक्ती भेटली. मयुरीची जिद्द पाहून त्यांनी तिला मोत्यांच्या शेतीचे तंत्र शिकवण्याचे कबूल केले. मयुरीने त्यांच्याकडून प्राथमिक तंत्र शिकून गावी परतली. तिच्या या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी एका मित्राने तिला स्वतःची इंदौरमधील जागा वापरण्याची परवानगी दिली.


सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून तिने मोत्यांची शेती करण्यास सुरुवात केली. स्वतःच्या पदरचे दीड लाख रुपये गुंतवून तिने या शेतीला सुरुवात केली. यात मोती तयार होण्यासाठी तब्बल ८ ते १५ महिने इतका कालावधी लागतो. मयुरीने शिंपल्यांचा पहिला लॉट तयार केला. मात्र, त्यातील सारे शिंपले मरण पावले. तिने पुन्हा कंबर कसली. या वेळेस तिने अडीच हजार शिंपले तयार केले. त्यापैकी हजार शिंपले मरण पावले. दीड हजार तगले. मयुरीच्या शेतीची चर्चा आजुबाजूच्या परिसरात होऊ लागली. मयुरीच्या हाती जे पहिले ‘पीक’ आले, त्यातून तिला सात ते आठ लाख रुपये मिळाले. खर्च वजा होऊन साडेपाच लाख रुपयांचा निव्वळ फायदा! अशाप्रकारे तिचा हा मोत्यांच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला.


मयुरीच्या यशाला प्रसिद्धी मिळाली आणि उत्सुक व्यक्तींनी मार्गदर्शनासाठी तिच्याकडे धाव घेतली. मयुरीने ‘पर्ल फार्मिंग’च्या प्रशिक्षणाचा कोर्स तयार केला. आजघडीला ती तिच्या प्रकल्पावर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणही देते. देशभरात शेतीविषयक कार्यक्रम-कॉन्फरन्समध्ये भाषण देण्यासाठी मयुरीला निमंत्रणे येतात. अनेक महाविद्यालयात तिला ‘व्याख्याती’ म्हणूनही बोलावले जाते. नैराश्यातून यशाकडे प्रवास करत ‘मोती’ पिकवणार्‍या मयुरी खैरे-आंबटकरला तिच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!


@@AUTHORINFO_V1@@