मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीला येणार्या काळात अनेक नूतन प्रयोग राबवावे लागतील. समाजातील तणाव कमी करण्यात कलावंत मोठे योगदान देत असतात, त्यांचे सामाजिक-आर्थिक आरोग्य राखणे, ही आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील आघाडीच्या कलावंतांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, रोहिणी हट्टगंडी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, शरद पोंक्षे, प्रशांत दामले, सुबोध भावे, सुमित राघवन, मृणाल कुलकर्णी, केदार जाधव, श्रेयस तळपदे, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी, संजय जाधव, मेघराज राजे भोसले, कौशल इनामदार, पंकज पडघन, आरोह वेलणकर या संवादात सहभागी झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनोद तावडे हे सुद्धा यात सहभागी झाले होते. नाटकांचे ऑनलाईन प्रयोग, टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाच्या समस्या, या क्षेत्रासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम, नाट्यगृहांचे भाडेदर, टोलमाफी, या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा, प्रेक्षकांमध्ये जागरूकता, पडद्यामागे काम करणाऱ्या सहाय्यकांचे प्रश्न, त्यांचे अर्थकारण, निर्मात्यांच्या अडचणी अशा व्यापक विषयांवर चर्चा झाली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक क्षेत्र आणि घटक कोरोनाविरोधातील हे युद्ध किती ताकदीने लढतोय, याचा प्रत्यय प्रत्येक घटकाशी चर्चेतून येत आहे. कोरोनामुळे जसे अर्थव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होताहेत, तसेच समाजातील तणावाचे विषय सुद्धा मोठे आहेत. हा तणाव कमी करण्याचे काम कलावंत करीत असतात. पण, कलावंतांचे अर्थकारण आणि आरोग्य याचीही आपल्याला काळजी करावी लागेल. आपल्याला नित्यनूतन प्रयोग करावेच लागतील. संदर्भ बदलले की, नवीन पर्याय सुद्धा उपलब्ध होतच असतात. सर्वांसाठी समान संधी सुद्धा तयार होत असतात. या क्षेत्राचे जे प्रश्न आहेत, ते केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत निश्चितपणे पोहोचविण्यात येतील. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून या युगातही अर्थार्जन त्यांना करता येईल. यावेळी कलावंतांनी अनेक सूचना केल्या. ४०टक्के क्षमतेने नाट्यगृह पुन्हा कसे सुरू करता येतील, प्रेक्षकांमध्ये विश्वासाचा भाव कसा निर्माण करता येईल, याबाबत अनेक सूचना उपस्थितांनी केल्या.