स्वा. सावरकर आणि पं. नेहरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2020   
Total Views |
nehru_1  H x W:



स्वा. सावरकर आणि पं. नेहरु या दोघांच्याही तुलनेतला महत्त्वाचा भाग हा आहे की, हे दोघेही महापुरुष नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध टोकावर उभे होते. त्यांच्या जीवनातील काही समांतर गोष्टी समोरासमोर ठेवून ही तुलना जर केली तर एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे राहाते.



आपण दि. २८ मे रोजी स्वा. सावरकरांची १३७ वी जयंती साजरी केली तर त्याच्या आदल्या दिवशी दि. २७ मे रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची ५६ वी पुण्यतिथी होती. या दोन्ही महापुरुषांचे आयुष्य बहुतांशी समांतर चालले. त्यांचे स्मृतिदिन सुद्धा अशा प्रकारे जुळलेले असावेत हा एक योगायोगाचा भाग आहे. या दोघांचाही आयुष्याचा आलेख जवळपास सारखा आहे - स्वा. सावरकर (१८८३ ते १९६६) तर पं. नेहरू (१८८९ ते १९६४)! या दोघांनीही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या भूमिका बजावल्या, स्वातंत्र्यासाठी आंदोलने केली व त्याबद्दल तुरुंगवासदेखील भोगला. दोघांनीही भारताच्या इतिहासावर लेखन केले. दोघांनीही आपल्या राजकीय भूमिकेची सुस्पष्ट वैचारिक मांडणी केली, जी आजतागायत चर्चेत आहे. या दोघांचे विचार मान्य असतील किंवा नसतील, तो भाग वेगळा, पण त्यांच्या विचारांची दखल न घेता भारतीय राजकारणाची चर्चा करता येत नाही. या सगळ्या तुलनेतला महत्त्वाचा भाग हा आहे की, हे दोघेही महापुरुष नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध टोकावर उभे होते. त्यांच्या जीवनातील काही समांतर गोष्टी समोरासमोर ठेवून ही तुलना जर केली तर एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे राहाते.


सुरुवात जन्मस्थानापासून करू :

* स्वा. सावरकरांचा जन्म नाशिकजवळ भगूर नावाच्या लहानशा गावात झाला. त्यांचे मातापिता हे महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या त्यावेळच्या कोणत्याही सामान्य कुटुंबासारखे एक कुटुंब होते. पण त्यांचे जन्मस्थळ असलेला भगूर येथील वाडा आजही ‘सावरकर स्मारक’ म्हणून उभा आहे, हजारो नागरिक त्या वाड्याला भेट देऊन दर्शन घेत असतात. स्वा. सावरकरांशी संबंधित कोणत्याही वास्तूचे जतन ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून केलेले नाही.


* पं. जवाहरलाल नेहरूंचा जन्म अलाहाबादमध्ये झाला. दीडशे वर्षांपूर्वीसुद्धा अलाहाबाद हे भारतातले एक मोठे व महत्त्वाचे शहर होते. त्यांचे पिताजी पं. मोतीलाल नेहरू अलाहाबादमधील एक नामवंत व यशस्वी वकील होते. आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी त्यांनी एक युरोपियन अध्यापक घरात ठेवला होता. पण पं. जवाहरलाल नेहरूंचे जन्मस्थान असलेले घर आज कोणालाही माहित नाही. ‘आनंद भवन’ या भव्य प्रासादात ते वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी राहायला गेले. पण त्यांचा जन्म कोणत्या घरात झाला याचा ठोस तपशील उपलब्ध नाही. त्यांचा जन्म झालेले घर अलाहाबाद नगर पालिकेनेसुद्धा जतन केलेले नाही. ‘आनंद भवन’ हे मात्र राष्ट्रीय स्मारक आहे. त्याशिवाय नवी दिल्लीतील त्रिमूर्ती भवन हे देखील ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून जतन केलेले आहे.


* स्वा. सावरकरांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नाशिक व पुण्यात झाले. नंतर वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी ते १९०६ साली इंग्लंडला गेले. त्यांच्या शिक्षणासाठी श्यामजी कृष्ण वर्मांनी शिष्यवृत्ती दिली होती. त्यांच्याच ‘इंडिया हाऊस’ या भारतीय विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या वसतिगृहात ते राहात होते. भारतीय क्रांतीकारकांना मदत केल्याच्या आरोपावरून सन १९१० साली त्यांना अटक केली गेली व त्यांची भारतात रवानगी झाली. त्यांचे शिक्षण पूर्ण झालेले असूनही ‘बॅरीस्टर’ पदवी त्यांना दिली गेली नाही.


* पं. जवाहरलाल नेहरू शालेय शिक्षण घेण्यासाठी १९०५ साली इंग्लंडला गेले. लंडनच्या अत्यंत प्रतिष्ठीत अशा हॅरो पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. सन १९०७ मध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या ‘ट्रिनिटी स्कूल’मध्ये प्रवेश घेतला. १९१२ साली ‘बॅरीस्टर’ पदवी घेऊन ते भारतात परतले.


* लंडनमध्ये असताना स्वा. सावरकरांनी १९०९ साली "The Indian War Of Independence Of १८५७' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या लेखनासाठी त्यांनी अस्सल ब्रिटीश कागदपत्रांचा वापर केला होता. १८५७ साली भारतात जे घडले ते केवळ 'Mutiny of Sepoy' नव्हते तर ते भारतीयांचे स्वातंत्र्ययुद्ध होते हे त्या ग्रंथाने प्रस्थापित केले. इंग्रज सरकारने त्या पुस्तकावर बंदी घातली होती. त्याच मुक्कामात स्वा. सावरकरांनी लिहिलेला ‘शिखांचा इतिहास’ या ग्रंथावरही बंदी घातली व त्याचे हस्तलिखित जप्त केले होते.


* १९०५ ते १२ या इंग्लंडच्या वास्तव्यात पं. नेहरूंनी कोणताही ग्रंथ लिहिला नव्हता. त्यांनी 'Discovery Of India' हा ग्रंथ १९३४ नंतर लिहिला व तो १९४६ साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथात १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाला फारसे स्थान दिलेले नाही. पं. नेहरूंच्या कोणत्याही पुस्तकावर इंग्रज सरकारने कधी बंदी घातली नव्हती.


* १९१० साली स्वा. सावरकरांना इंग्लंडमध्ये अटक झाली. त्यांना भारतात आणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना काळ्या पाण्याच्या एकंदर ५० वर्षांच्या दोन सजा ठोठावल्या गेल्या. १९११ साली त्यांची रवानगी अंदमानला झाली. त्याच वेळेला त्यांचे दोन्ही भाऊदेखील काळ्या पाण्याची सजा भोगत अंदमानमध्येच होते. तिथे त्यांना काळ कोठडी, सहा महिने एकांतवास, संपूर्ण एक आठवडा हातापायात बेड्या घालून उभे ठेवणे, कोलू चालवणे इत्यादी सर्व प्रकारच्या छळाचा सामना करावा लागला. १९२१ साली त्यांची अंदमानमधून सुटका झाली पण रत्नागिरीत स्थानबद्ध म्हणून राहावे लागले. १९३७ नंतर त्यांच्या हालचालींवर घातलेली बंधने बर्‍याच प्रमाणात कमी झाली. तुरुंगात असताना स्वा. सावरकरांना कोणीही कुटुंबीय भेटू शकले नाहीत. कुटुंबियांची पत्रेसुद्धा त्यांना दिली नाहीत. याच काळात त्यांच्या थोरल्या वहिनींचा मृत्यू झाला. पण त्यावेळेला कुटुंबियांना भेटू देणे तर दूरच राहिले, या बातम्यासुद्धा इंग्रज सरकारने त्यांना दिल्या नाहीत.


* पं. जवाहरलाल नेहरुंना १९२१ साली पहिल्यांदा अटक झाली. तेव्हापासून एकूण नऊ वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. एकूण ३ हजार २५९ दिवस म्हणजे सुमारे ८ वर्षे व ११ महिन्यांचा काळ त्यांनी तुरुंगात घालवला. नेहरूंनी लखनौ, नैनी, डेहराडून, अलीपूर (कलकत्ता), गोरखपूर, अल्मोरा, नाभा, बरैली, अहमदनगर (महाराष्ट्र) या तुरुंगांमध्ये आपला शिक्षेचा काळ घालवला. त्यातील अहमदनगर हेच सर्वात दूरचे स्थान होते. नैनी, डेहराडून, अल्मोरा, नाभा ही थंड हवेची ठिकाणे होती. पं. नेहरुंना कायम श्रेणी एकच्या राजबंद्याचा दर्जा होता. त्यांचे कुटुंबीय त्यांना कधीही भेटू शकत होते. बहुतेक वेळा त्यांना शासकीय विश्रामगृहात कैदी म्हणून ठेवत असत.


त्यांचे पिताजी पं. मोतीलालजी नेहरू (सन १९३१) व पत्नी कमला नेहरू (सन १९३६) या दोघांचेही निधन झाले तेव्हा दोन्ही वेळेला जवाहरलालजी अटकेत होते. पण ‘शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी’ सरकारने त्यांना सोडल्यामुळे ते दोन्ही प्रसंगी, आपले पिताजी व पत्नी यांच्या मृत्युशय्येपाशी हजर होते. आजारी कमलाजींना भेटण्यासाठी नेहरुंना पाच वेळा पॅरोल दिला गेला होता. पत्नी कमला नेहरू अखेरच्या काळात उपचारांसाठी युरोपला गेल्या होत्या. ४ सप्टेंबर १९३५ रोजी, साडेपाच महिन्यांची शिक्षा बाकी असताना इंग्रज सरकारने पं. नेहरूंची अचानक सुटका केली, त्याच संध्याकाळी ते विमानाने युरोपला रवाना झाले. श्रीमती कमला नेहरू यांचा मृत्यू जर्मनीतच फेब्रुवारी १९३६ मध्ये झाला, हा सर्व काळ पं. नेहरू त्यांच्याच बरोबर युरोपमध्ये होते. फ्रँक मोराईस यांनी लिहिलेल्या नेहरूंच्या चरित्रामध्ये याबाबतचा सर्व तपशील दिलेला आहे.


* स्वा. सावरकरांनी तुरुंगवासाच्या काळात अनेक कविता तुरुंगाच्या भिंतींवर खिळ्यांनी लिहून ठेवल्या. त्यांना लेखन साहित्य, पुस्तके, वर्तमानपत्रे काहीही दिले जात नव्हते.

* 'Discovery of India' हा ग्रंथ पं. नेहरूंनी तुरुंगात लिहिला. त्यासाठी लागणारे सर्व लेखन साहित्य पं. नेहरू घरून मागवत होते, त्यांना लागणारे सर्व संदर्भ ग्रंथ सरकारने तुरुंगात उपलब्ध करून दिले.

सर्वात शेवटचा मुद्दा!


स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दोन्ही भाऊ काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आले होते. एकाच वेळेला तिघेही बंधू अंदमानच्या तुरुंगात होते. त्यांची सर्व मालमत्ता इंग्रज सरकारने जप्त केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या तिघांपैकी कोणाचीही अपत्ये किंवा वारस आपल्या पित्याच्या अथवा चुलत्याच्या त्यागाचा फायदा घेण्यासाठी राजकारणात, समाजकारणात आला नाही. वाड-वडिलांच्या त्यागाची परतफेड मिळवायला समाजाकडे गेला नाही. त्यांची नावेसुद्धा आज कोणाला सांगता येणार नाहीत.


ही तुलना इथेच संपवलेली चांगली! नाही का?

@@AUTHORINFO_V1@@