गोळीबार प्रकरणी माहीम पोलिसांकडून दोघांना अटक
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाल्याचे दिसत आहे. मुंबईत लॉकडाऊनदरम्यान गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री ९ च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. माहिमच्या वीर सावरकर मार्गावर जैतून कपांऊड या ठिकाणी ही घटना घडली. यावेळी रिझवान बेग या व्यक्तीने आसिफ नावाच्या एका व्यक्तीवर गोळीबार केला. रिझवान बेग हा माहिम दर्गा ट्रस्टी सोहील खंडवाणीचा निकटवर्तीय आहे.
या गोळीबारानंतर पोलिसांनी वीर सावरकर मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसेच घटनास्थळी पंचनामा सुरु आहे. हा गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.