‘द्रविड’ची उणीव भरून काढणारा ‘राहुल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2020
Total Views |
lokesh rahul_1  


आजघडीला लोकेश राहुलचे नाव ‘द्रविड’सारखा खेळाडू म्हणून घेतले जाते. मात्र, इथवर पोहोचण्यासाठी त्याने संघर्ष केला असून त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


क्रिकेटविश्वात भारतीय खेळाडूंनी रचलेले विक्रम आजही जगप्रसिद्ध आहेत. कसोटी क्रिकेटच्या प्रकारात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा जगभरात ‘दि वॉल’ म्हणून प्रसिद्ध होता. मूळचा कर्नाटकमधील खेळाडू असणारा हा राहुल द्रविड भारताचा ‘भरोसेमंद क्रिकेटर’ म्हणून ओळखला जायचा. भारतीय संघात एकेकाळी बलाढ्य यष्टीरक्षकाची उणीव जाणवत असे. राहुल द्रविडने आपल्या क्रिकेट करिअरच्या मध्यवर्ती भागातच यष्टीरक्षकाचा कसून सराव केला आणि उत्तम यष्टीरक्षक बनून दाखवले. २००३ साली झालेल्या विश्वचषकात द्रविडच भारताचा मुख्य यष्टीरक्षक होता. भारतीय संघाला संकटसमयी तारले होते, त्या ‘भरोसेमंद’ राहुल द्रविडनेच! कालांतराने राहुलने निवृत्ती पत्करली आणि भारतीय संघातील ही भरवशाची ‘दि वॉल’ नाहीशी झाली. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या रुपात मजबूत यष्टीरक्षक भारतीय संघाला मिळाल्यामुळे ही कमी कधी जाणवत नव्हती. मात्र, २०१९ विश्वचषक सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दुरावला आणि संघात एका बलाढ्य यष्टीरक्षकाची उणीव भारताला पुन्हा एकदा जाणवू लागली. परंतु, यंदाची परिस्थिती काही पहिल्यासारखी नव्हती. भारताची ही ‘दि वॉल’ संघात नसल्याने यष्टीरक्षकाचा प्रश्न संघापुढे कायमच होता. मात्र, भारतीय संघात इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली. मूळचा कर्नाटकाचा असणार्या राहुलने पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा कसून सराव केला आणि संघातील उणीव भरून काढली. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेदरम्यान यष्टीमागे उत्तम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत राहुलने संघातील उणीव भरून काढली. यापुढे संघात धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक म्हणून राहुललाच संधी मिळाली पाहिजे, यावर सर्वांचेच एकमत झाले. यंदाही संघाला तारण्यासाठी कर्नाटकातील एक राहुलच पुन्हा पुढे आला. मूळचा बंगळुरुचा असलेल्या या लोकेश राहुलने सर्वांना ‘द्रविड’ची पुन्हा आठवण करून दिली. द्रविडची उणीव भरून काढणारा हा खेळाडू असल्याचे मत अनेक समीक्षक राहुलविषयी बोलताना व्यक्त करतात. आजघडीला लोकेश राहुलचे नाव ‘राहुल द्रविडसारखा खेळाडू’ म्हणून घेतले जात असले तरी इथवर पोहोचण्यासाठी त्याने आपल्या जीवनात संघर्ष केला आहे.


लोकेश राहुलचा जन्म १८ एप्रिल, १९९२ साली झाला. मूळचा बंगळुरुचा असणारा राहुल लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. शालेय जीवनादरम्यान आपल्या अभ्यासासोबतच खेळाचीही आवड त्याने जोपासली. प्रत्येक इयत्तेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणार्या या राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे ध्येय लहानपणीच निश्चित केले होते. मात्र, केवळ क्रिकेट करिअरवर अवलंबून न राहता आपण उच्चशिक्षित कसे होऊ, याकडेही राहुलने कटाक्षाने लक्ष दिले. दहावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केले. येथेही चांगल्या प्रकारे अभ्यास करत त्याने बंगळुरुतील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. राहुल याचे वडील के. एन. राहुल हे स्वतः एक अभियंते आहेत. त्यांनी राहुलला उच्चशिक्षित तर बनविलेच. मात्र, आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या क्षेत्रात करिअर कसे घडविता येईल, यासाठीही उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानही राहुल क्रिकेटचा नित्यनियमाने सराव करत असे. शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी आराम न करता राहुल बंगळुरुमधील क्रिकेट क्लबमध्ये सरावासाठी जाई. क्रिकेट सरावानंतर दररोज आपला अभ्यासही पूर्ण करी. शिक्षणासोबतच आपली खेळाची आवड जोपासणे कठीण जाई. मात्र, तरीही राहुलने आपली मेहनत सुरुच ठेवली. बंगळुरुमधील क्रिकेट क्लबमध्ये एकदा सराव सामन्यादरम्यान राहुलवर नामांकित प्रशिक्षकांची नजर पडली. त्यांनी राहुलला कर्नाटकाच्या रणजी संघामधून खेळण्याचे निमंत्रण दिले. राहुलने आनंदाने ते स्वीकारले. रणजी संघात उत्तम प्रदर्शन केल्यानंतर राहुलला आयपीएलमधून खेळण्याची संधी मिळाली. येथेही उत्तम प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याला भारतीय संघात स्थान दिले.


राहुल आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत असल्याचे प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. राहुलने यष्टीरक्षकाचीही जबाबदारी स्वीकारत भारतीय संघाची मोठी चिंता मिटवली आहे. भारतीय संघासाठी राहुलचे योगदान सध्या मोलाचे मानले जात असून ‘विस्डेन इंडिया अल्मनॅक’च्या सहाव्या आवृत्तीमध्ये वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ म्हणून त्याची निवड करण्यात आली. नुकतेच त्याला या पुरस्काराने गौरविण्यात आले. कर्तबगार राहुलची स्तुती करावी तितकी कमीच. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@