अवघ्या २४ तासात त्यांनी तयार केला कोरोना चाचणी कक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

kiyoska_1  H x


धुळे
: कोरोना रुग्णांची वाढती संख्या...प्रशासनावर वाढत असलेला ताण...आरोग्य सुविधांचा तुटवडा...चाचण्या वाढविण्यासाठीच्या यंत्रणांचा अभाव यांसारख्या अनेक नकारात्मक बातम्या आपल्या रोज वाचनात येत आहेत.परंतु या बातम्यांकडे नकारत्मकतेने न पाहता त्यातून सकारात्मक मानसिकता ठेवून विचार केल्यास प्रशासनास काय सहकार्य करू शकतो हे सर्वांच्या लक्षात यावे. याकरिता जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापरीने सरकारला मदतीचा हात देणारे अभियंता संग्राम लिमये यांनी घशातील द्रवपदार्थाचे नमुने घेणारे कोरोना चाचणी कक्ष अगदी कमी खर्चात तयार केले. हे विनामूल्य धुळे जिल्हा रुग्णालयाला भेट दिले.



याविषयी माहिती देताना अभियंता संग्राम यांनी सांगितले,"वर्तमानपत्रात तमिळनाडू येथील रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांचे घशाचे स्वॅप गोळा करण्यासाठी एक कोरोना चाचणी कक्ष ( बंदिस्त काचेची केबिन ) बनवण्याची बातमी वाचनात आली. सदर कोरोना चाचणी कक्षाची किंमत ९९ हजार रुपये एवढी असल्याचे देखील वाचनात आले. प्रयत्न केल्यास बऱ्याच कमी किमतीत आपण हे किओस्क तयार करू शकतो. आपल्याच कारखान्यात तशी केबिन तयार करून धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला द्यावी असा विचार माझ्या मनात आला. याबाबत धुळे जिल्हा रुग्णालयात लॅबच्या इन्चार्ज डॉक्टर द्रविड यांच्याशी संपर्क साधत रुग्णालयात अशी काही सोय आहे का याबाबत विचारणा केली. अशी व्यवस्था नसल्याचे यांच्याकडून कळाले." असे ते सांगतात. 
 
 
जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था नसल्याचे कळताच संग्राम यांनी सहकाऱ्यांबरोबर फोन वर संपर्क करून यासंदर्भात चर्चा केली. व लवकरात लवकर बनवून देऊ याबाबात रुग्णालय कर्मचाऱ्यांना शाश्वती दिली. संग्राम यांचा इंटेरियर डिझाईनिगचा व्यवसाय असल्याकारणाने त्यांना याबाबत माहिती देखील होती व कक्ष बनविण्यासाठी लागणारे साधन देखील बऱ्यापैकी उपलब्ध होते. फ़क़्त अडचण होती ती यासाठी लागणाऱ्या ग्लोव्हजची जे फक्त मुंबईत तयार होतात.संग्राम यांनी  व्यवसायातील सहकारी विजय गवळे,अतुल कुलकर्णी व कुटुंबियांशी चर्चा केली. त्यांनी देखील या प्रस्तावाला मान्यता दिली. धुळे जिल्हा रुग्णालयात इंटर्न डॉ. स्मितेश देसले यांच्याशी संपर्क साधत त्यांनी रुग्णालयातील अधिष्ठाता व शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली. डॉ.देसले यांनी रुग्णालयात माहिती दिली की, संग्राम लिमये कोरोना चाचणी कक्ष बनवून दान करू इच्छित आहेत. याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काम करण्यासंदर्भात संग्राम याना दुपारी तीन वाजेपर्यंत संमतीपत्र दिले. त्यानंतर संग्राम यांनी युध्दगतीने कामाला सुरुवात केली.



साधारण डिझाईन कसे असेल, काय काय मटेरियल लागेल , लॉकडाऊनच्या काळात ते कसे मिळवता येईल यासंदर्भात सर्व सदस्यांनी उत्तम नियोजन केले. यावर जे ग्राफिक प्रिंट करायचे होते ते देखील शाम अग्रवाल यांनी अतिशय कमी वेळात डिझाईन करून प्रिंट करून दिले.आणि याच सर्व प्रयत्नाचे यश म्हणजे संग्राम यांचे कोरोना चाचणी कक्ष त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तयार सुद्धा झाले.एक कोरोना चाचणी कक्ष बनविण्यासाठी संग्राम यांना ६४ हजार रुपये इतका खर्च आला. आज रविवार १२ एप्रिल रोजी कियोस्क विनामूल्य धुळे जिल्हा रुग्णालयाला भेट दिले. ज्यामुळे तेथील डॉक्टर व लॅब असिस्टंट हे रुग्णांची टेस्ट घेताना रुग्णांच्या संपर्कात येणार नाहीत व त्यांना रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. संग्राम लिमये म्हणतात,"या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान वाटतो की लॉकडाऊन असून देखील बातमी बघितल्या नंतर २४ तासाच्या आत आम्ही हे किओस्क तयार करू शकलो. याचे सर्व श्रेय टीमचे सदस्य, सहकारी,कर्मचारी व सप्लायर यांचे आहे.अशा टीमचा सदस्य असण्याचा व अशी टीम लीड करण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आज सरकार एकटे आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी ही भूमिका घेतली आहे.प्रत्येकाने प्रशासनाला आपल्याला शक्य ती मदत व सहकार्य करावे." असे आवाहन ही त्यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@