कोरोनाचा फटका ऑलम्पिकलाही ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2020   
Total Views |

IOC_1  H x W: 0


टोकियो आणि आयओसी यांच्यातील करारानुसार ऑलम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात येऊन या वर्षाच्या अखेरीस घेण्याची तरतूद आहे
, अशी माहिती जपानच्या ऑलिम्पिक मंत्र्यांनी नुकतीच दिली.



यंदा जपानची राजधानी टोकियोत होणार्
‍या ऑलिम्पिकवर कोरोना विषाणूचे संकट घोंघावत असल्याचे वृत्त आहे. टोकियो ऑलिम्पिकबाबत विविध विधाने केली जात असतानाच आता हे नवे संकट या स्पर्धांवर घोंघावू लागले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले, तर या स्पर्धेच्या आयोजनाचा विचार करण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) सदस्य डिक पाऊंड यांनी नुकतेच म्हटले होते, तर ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणेच होणार, असे आयोजकांनी सांगितले होते. मात्र, ही स्पर्धा रद्द न होता, पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता असल्याचे वृत्त आता समोर येत आहे. टोकियो आणि आयओसी यांच्यातील करारानुसार ऑलम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात येऊन या वर्षाच्या अखेरीस घेण्याची तरतूद आहे, अशी माहिती जपानच्या ऑलिम्पिक मंत्र्यांनी नुकतीच दिली.



टोकियो ऑलिम्पिकला २४ जुलैपासून सुरुवात होणार आहे
. ही स्पर्धा २०२० वर्षात झाली पाहिजे, पण ठराविक महिन्यातच झाली पाहिजे, असा कोणताही उल्लेख करारात नाही. याबाबत जपानच्या ऑलिम्पिक मंत्री सेइको हाशिमोटो संसदेत म्हणाल्या, करारानुसार टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२० वर्षात झाली पाहिजे. याचाच अर्थ असा की, आम्हाला ही स्पर्धा पुढे ढकलता येऊ शकेल. ऑलिम्पिक स्पर्धा जर २०२० मध्ये झाली नाही, तरच आयओसीला या स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार असणार आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जपानमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, असे असतानाही टोकियो ऑलिम्पिक ठरलेल्या वेळीच सुरू व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सेइको हाशिमोटो यांनी नमूद केले आहे.



वरील सर्व बाजू तांत्रिक स्वरूपाच्या असल्या तरी
, असे काही घडल्यास त्याचे होणारे परिणाम, नाण्याची दुसरी बाजूदेखील आपण येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण ऑलिम्पिक स्पर्धा या खेळाडूंचा जीव की प्राण असतात. त्यांचे ते स्वप्न असते. जर, व्यक्त करण्यात आलेल्या शक्यतेनुसार ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या तर, एक खेळाडू म्हणून खेळाडूंच्या मानसिक स्थितीवर त्याचा परिणाम होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. आटोक्यात आलेले स्वप्न, समोर दिसत असणारे ध्येय हे जर लांबणीवर जाताना दिसले तर, खेळाडूंच्या मनावर ताण येण्याचा आणि त्याचा परिणाम एकंदरीत कामगिरीवर होण्याचादेखील धोका नाकारता येत नाही. तसेच, जगभरात कोरोना विषाणूची पसरणारी दहशत ही काही लपून राहिलेली नाही. आजमितीस जगाच्या पाठीवरील बव्हंशी राष्ट्रात कोरोना विषाणूबाबत खबरदारी बाळगली जात आहे. या विषाणूचा सामना कसा करावा, याबाबतदेखील अद्याप ठोस असे काही उपाय समोर आलेले नाहीत. आदी प्रकारच्या सर्व बाबी लक्षात घेतल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या वर्षाअखेर आटोक्यात येईलच, याचीदेखील काही ठोस अशी शाश्वती नाहीच.




तेव्हा जर खरोखरीच ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली तर मात्र
, खेळाडूंच्या बाबतीत हे असे घडणे निश्चितच अघटित ठरणारे असेल. तसेच, जे खेळाडू या ऑलिम्पिकनंतर निवृत्तीचा विचार करत असतील, त्यांच्यासाठी असे काही होणे एक स्वप्नभंग निश्चितच असेल.तसेच टोकियो ऑलिम्पिक रद्द होणे जपानला महागात पडू शकणारे नक्कीच आहे. या स्पर्धेसाठी १.३५ ट्रिलियन येन (१ लाख, ३५ हजार कोटी रुपये) इतका खर्च अपेक्षित आहे. जपान सरकारने ऑलिम्पिक स्टेडियम बनवण्यासाठी १२० बिलियन येन (१२ हजार कोटी रुपये), तसेच २०२० पॅरालिम्पिकसाठी ३० बिलियन येनची (३ हजार करोड रुपये) तरतूद केली आहे, असे सेइको हाशिमोटो यांनी सांगितले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांवर कोरोना विषाणूचे सावट हे आर्थिक, मानसिक अशा दोन्ही अर्थाने तापदायी अशाच स्वरूपाचे आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यामागे काही मानवनिर्मित उद्देश आहे काय? याचेदेखील मूळ अजून बाहेर आलेले नाही. तर्कवितर्क अनेक समोर येत आहेत. मात्र, खेळाची पंढरी असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांना याची झळ बसू नये, हीच कामना खेळाडू, नागरिक आणि क्रीडा रसिक निश्चित करत असणार.

@@AUTHORINFO_V1@@