रुपेरी पडद्यावरचा ‘मस्त कलंदर’ अभिनेता!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2020   
Total Views |

raviraj_1  H x




अभिनेते ‘रविराज’ यांनी कलाक्षेत्रात तब्बल २५ वर्ष नवनवीन प्रयोग केले. काळाच्या ओघात मागे पडत गेलेल्या या ‘मस्त कलंदर’ अभिनेत्याने बुधवारी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या कलाप्रवासाची माहिती देणारा हा लेख...



देखणे व्यक्तिमत्त्व, हसरा आणि प्रसन्न चेहरा लाभलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे खरे नाव रवींद्र अनंत कृष्णा राव. चित्रपटांच्या दुनियेत त्यांचे ‘रविराज’ असे नामकरण झाले आणि शेवटपर्यंत ते याच नावाने ओळखले गेले. रविराज यांचा जन्म मंगळुरुचा. ते नऊ महिन्यांचे असताना त्यांचे वडील अनंत कृष्णा राव हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले आणि रविराज मुंबईकर झाले. ‘रविराज’ या नावावरून किंवा त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या वावरावरून ते अमराठी आहेत, याची शंकाही कधी कोणाला आली नाही. कानडी भाषिक असलेल्या रविराज यांचे शालेय शिक्षण मुंबईतच ‘डीजीटी’ अर्थात ‘धरमसी गोविंदजी ठाकरसी’ या मराठी शाळेत, तर इंटरपर्यंतचे शिक्षण के. सी. महाविद्यालयात, तसेच विज्ञान शाखेतील ‘बीएस्सी’पर्यंतचे पुढील शिक्षण रुपारेल महाविद्यालयात झाले.


‘इंटर’नंतर त्यांना पुण्याच्या ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ (एफटीआय) मध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण, घरच्यांची ‘पदवीधर हो, नोकरी कर आणि सुरक्षित आयुष्य जग’, अशी एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी तो विचार सोडून दिला आणि पुढे शिकायचे ठरविले. शिक्षण पूर्ण झाले आणि लगेचच त्यांना ‘प्रॉडक्शन केमिस्ट’ म्हणून जे. एन. मॉरिसन (आताची निव्हिया कंपनी) कंपनीत नोकरीही मिळाली. काही वर्षांनी ती कंपनी मुंबईतून बंगळुरूला हलविण्यात आली. मात्र, तिथे जाऊन आपल्याला पगारवाढ तर मिळणार नाही, त्यापेक्षा मुंबईत राहून चित्रपट क्षेत्रात स्वतःला आजमावून पाहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि नोकरीचा राजीनामा दिला.


चित्रपटसृष्टीत त्यांचा संघर्ष सुरू होता. त्याच दरम्यान, परिसरातील नागरी समस्येच्या निमित्ताने त्यांची भेट स्थानिक नगरसेवक आणि चित्रपट निर्माते प्रभाकर निकळंकर यांच्याशी झाली. समस्या सुटेल असे आश्वासन देत निकळंकरांनी त्यांना ‘सध्या काय करताय?,’ असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला असून, चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. हे ऐकून निकळंकर त्यांना संगीतकार व ‘शूरा मी वंदिले’ या चित्रपटाचे निर्माते श्रीकांत ठाकरे यांच्या घरी घेऊन गेले. निकळंकरही त्या चित्रपटाचे एक निर्माते होते. या चित्रपटात त्यांची निवड झाली आणि त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली. योगायोग म्हणजे या चित्रपटातले ‘अरे दु:खी जीवा बेकरार होऊ नको’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे मोहंमद रफी यांनी गायले. मोहंमद रफी यांनी पार्श्वगायन केलेले ते पहिले मराठी गाणे!


खरे तर ‘आहट’ हा त्यांचा हिंदीतला पहिला चित्रपट. परंतु काही ना काही कारणाने त्याचे प्रदर्शन रेंगाळले. या दरम्यान, त्यांची भूमिका असलेला गुलजार यांचा ‘अचानक’ हा हिंदी आणि राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जावई विकत घेणे आहे’ हा मराठी चित्रपट ‘आहट’च्या आधी प्रदर्शित झाले. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जावई विकत घेणे आहे,’ या चित्रपटात त्यांनी नायक साकारला. गणेश सोळंकी, शरद तळवलकर, मधुकर तोरमडल, राजा बापट, रुही आदी कलाकार त्यात होते. हा चित्रपट गाजला आणि त्यातील रविराज आणि रुही यांच्यावर चित्रित झालेले ‘या मिलनी रात्र ही रंगली’ हे गाणे लोकप्रिय झाले. या चित्रपटाने रविराज यांना नाव आणि प्रसिद्धी मिळाली. नंतर रविराज यांनी ‘ओवाळिते भाऊराया’, ‘तूच माझी राणी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘देवापुढे माणूस’, ‘अजातशत्रू’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘जावयाची जात’, ‘नणंद भावजय’, ‘भन्नाट भानू’ आदी मराठी चित्रपट केले. ‘ओवाळिते भाऊराया’मधील ‘बाजार फुलांचा भरला, मज तुळस दिसेना, मज बहीण दिसेना’, ‘दोस्त असावा तर असा’ चित्रपटातील ‘जे जे सुंदर ते माझे घर, मी तर आहे मस्त कलंदर’, ‘जावयाची जात’मधील ‘प्रिया सखी चंद्रमुखी जवळ ये जरा, माझ्या प्रितपाखरा’ ही त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी गाजली. ‘अन्यायाचा प्रतिकार’ हा त्यांनी काम केलेला शेवटचा मराठी चित्रपट. रविराज यांनी ‘अचानक’, ‘तीन चेहरे’, ‘एक चिठ्ठी प्यार भरी’, ‘चांद का टुकडा’ आणि गाजलेल्या ‘खट्टामिठा’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. त्यांची ‘थोडा है थोडे की जरुरत है’ आणि ‘रोल गोल माकुनिसा’ ही गाणी गाजली. ‘मेघनी रात’, ‘गाजर नी पिपुडी’, ‘जे पीड परायी जानी रे’ आदी गुजराती चित्रपटांमधूनही त्यांनी अभिनय केला.


मधुसूदन कोल्हटकर यांच्या ‘शबरी’ या नाटकाद्वारे त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर ‘डार्लिंग डार्लिंग’ यासह मधुसूदन कालेलकर यांची ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ ही नाटके तसेच ‘हिट अ‍ॅण्ड हॉट’च्या जमान्यात ‘बदफैली’, ‘डाग’, ‘सेक्सी’ अशी नाटकेही केली. या सर्व नाटकांचे एकूण तीन हजार प्रयोग त्यांनी केले. रामानंद सागर यांच्या ‘श्रीकृष्ण’ मालिकेत त्यांनी ‘गर्ग’ मुनी साकारले होते. ‘अदालत’, ‘एअर होस्टेस’, ‘शिव पुराण’आदी हिंदी मालिकांमधूनही त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.


काळाच्या ओघात देखणे व्यक्तिमत्त्व, प्रसन्न आणि हसरा चेहरा असलेला हा अभिनेता रुपेरी दुनिया आणि मायावी झगमगाटापासून पूर्णपणे दूर गेला. इतका संघर्ष करून, इतके सुपरहिट चित्रपट देऊनसुद्धा ते जीवनाच्या शेवटपर्यंत भाड्याच्या घरात राहिले.


तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ मराठी, हिंदूी, गुजराती चित्रपट आणि मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवून, १८ मार्च वयाच्या ७६व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा या हरहुन्नरी कलाकाराच्या स्मृतींना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण श्रद्धांजली!!


@@AUTHORINFO_V1@@